पत्नीला घटस्फोट दे, नाहीतर हात-पाय तोडू...चौघांनी दिली तरुणाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:41 IST2019-09-23T14:41:07+5:302019-09-23T14:41:14+5:30
उमेशला रस्त्यावर थांबविले व हात पकडून तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे, अन्यथा तुझे आम्ही हात-पाय तोडू, अशी धमकी दिली.

पत्नीला घटस्फोट दे, नाहीतर हात-पाय तोडू...चौघांनी दिली तरुणाला धमकी
अकोला : खरपरोड येथील युवक डाबकी रोड परिसरात कामानिमित्त असताना त्याला चार युवकांनी अडवून तुझ्या पत्नीला घटस्फोट दे, नाहीतर हात-पाय तोडू, अशी धमकी दिल्याची घटना घडली असून, याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. खरपरोड येथील पंचशील नगरातील रहिवासी उमेश नामक युवक शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डाबकी भौरद गावाजवळून दीड किलोमीटर अंतरावर क्षीरसागर यांच्या शेताजवळ असताना अनोळखी चार जण दोन दुचाकींवरून आले. त्यांनी उमेशला रस्त्यावर थांबविले व हात पकडून तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे, अन्यथा तुझे आम्ही हात-पाय तोडू, अशी धमकी दिली. उमेशने त्यांच्या हाताला झटका मारून तेथून पळ काढला व तो थेट डाबकी रोड पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला; मात्र ते दिसून आले नाही. याप्रकरणी उमेशच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.