कमी पटाच्या शाळा बंद करण्यावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:32 IST2018-09-26T13:32:30+5:302018-09-26T13:32:34+5:30
अकोला : एकाच परिसरात सुरू असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्गाचे समायोजन करण्याच्या मुद्यांवर मंगळवारी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली.

कमी पटाच्या शाळा बंद करण्यावर चर्चा
अकोला : एकाच परिसरात सुरू असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्गाचे समायोजन करण्याच्या मुद्यांवर मंगळवारी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानुसार येत्या काळात काही शाळा बंद होण्याचे गंडांतर येण्याची शक्यता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. त्याला विरोध म्हणून काहींनी मंगळवारी काळ्या फिती लावून निषेध केला आहे.
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय येत्या काळात शासनाकडून होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एका परिसरात असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्ग इतर ठिकाणी समायोजित करता येतील का, तसे करण्यासाठी किती शाळा पात्र ठरतील, याची माहिती मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये विचारण्यात आली; मात्र अकोला जिल्ह्यातील एकाच परिसरात असलेल्या कमी पटसंख्येची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
शासनाच्या या धोरणामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जातील. त्यातील शिक्षकांची पदे कमी होऊन नवीन शिक्षक भरती पूर्णत: बंद केली जाणार आहे. अनेक शिक्षक आपल्याच शाळेत अतिरिक्त ठरून त्यांचे इतरत्र रिक्त जागेवर समायोजन केले जाईल. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होणार आहे. याबाबतच्या भावना व्यक्त करण्यासाठी शिक्षक संघटनांनी निषेध करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाबाबत शासनाला निवेदनही पाठविल्याचे संघटनेचे राजेश सावरकर यांनी म्हटले आहे.