अकोला जिल्ह्यात वादळाची विनाशलीला
By Admin | Updated: June 3, 2014 20:52 IST2014-06-03T19:17:52+5:302014-06-03T20:52:40+5:30
अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि मान्सूनपूूर्व पावसाने थैमान घातल्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले.

अकोला जिल्ह्यात वादळाची विनाशलीला
अकोला : जिल्ह्यात सोमवार, २ जून रोजी ठिकठिकाणी वादळी वारा आणि मान्सूनपूूर्व पावसाने थैमान घातल्यामुळे शेकडो घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरसह परिसरात रोजी सायंकाळी वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडला. वादळी वार्यामुळे लिंबू उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसला.
अकोला जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विविध ठिकाणी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. त्यात सोमवार, २ जून रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर, निंबी बु., निंबी खु., वडगाव, खेर्डा (भागाई) आदी भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. यामध्ये निंबी खुर्द येथील शेतकर्याच्या शेतामधील लिंबूची ६०० झाडे उन्मळून पडल्याने शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. निंबी बु. येथील विनोद दुर्योधन हेंडस्कार, देवीदास राघोजी मोतीनागरे, तर खेर्डा भागाई येथील नीळकंठ मधुकर महल्ले या लिंबू उत्पादक शेतकर्यांच्या शेतामधील लिंबूची झाडे उन्मळून पडली. पिंजर, वडगाव, खेर्डा (भागाई), पार्डी, मोझरी या गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वार्यामुळे अनेक घरांवरील टीन उडून गेले. तसेच घरांचेही नुकसान झाले. रस्त्यांवरील झाडे पडली आणि विजेच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. निंबी खु. येथील देवचंद आत्माराम क्षीरसागर, प्रकाश निरंजन पांडे, गुलाब दामोदर, साहेबराव पांडे, साहेबराव दामोदर, सरस्वतीबाई चक्रे यांच्या घरावरील टीन उडून गेले. दरम्यान, दोनद बु. आणि तामशी येथेही सोमवारी सायंकाळी वादळी वार्यासह पावसाने थैमान घातले. अनेकांच्या घरावरील टीन उडून गेले. तामशी येथील जि.प. शाळेच्या छताची पूर्ण टीन उडून गेले. अनेक जनावरेही जखमी झाली. जिल्हाधिकार्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी क रून तत्काळ मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.