थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुरवठा खंडित!
By Admin | Updated: May 24, 2017 01:18 IST2017-05-24T01:18:56+5:302017-05-24T01:18:56+5:30
मुदतीत वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुरवठा खंडित!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील एकूण ४ लाख ५२ हजार २९४ ग्राहकांकडे वीज देयकाची ५७ कोटी ३२ लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. सदर ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा न केल्यास या ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असून, ग्राहकांनी त्वरित व मुदतीत थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अकोला मंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे असलेल्या तीन विभागांमध्ये एकूण १ लाख ४९ हजार ४३१ ग्राहकांकडे १९ कोटी ५ लाख ९५ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये अकोला ग्रामीण विभाग ७५ हजार ११५ ग्राहकांकडे ८ कोटी ९ लाख ४४ हजार, अकोला शहर विभाग ३९ हजार २२१ ग्राहकांकडे ७ कोटी १५ लाख ४६ हजार, तर अकोट विभागातील ३५ हजार ९५ ग्राहकांकडे ३ कोटी ८१ लाख ४ हजार एवढी थकबाकी प्रलंबित आहे.
महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असून, विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.