जिल्ह्यातील २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:36+5:302021-02-05T06:17:36+5:30
सचिन राऊत अकाेला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा गतवर्षीच्या काळात वाढलेला हैदाेस कमी करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ॲक्शन ...

जिल्ह्यातील २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई
सचिन राऊत
अकाेला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा गतवर्षीच्या काळात वाढलेला हैदाेस कमी करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ॲक्शन प्लानच तयार केला आहे. या गुन्हेगारांचे कंबरडे माेडून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र झाेपडपट्टीदादा नियंत्रण कायदा एमपीडीए तसेच जिल्ह्याच्या बाहेर थेट दाेन वर्षांसाठी हद्दपारीच्या कारवाईचे अस्त्र उगारले आहे. त्यानुसार गत ८ महिन्याच्या कालावधीत तब्बल २६ टाेळ्यांना हद्दपार करण्यात आले असून, ९ गुंडांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.
राजकीय पदाधिकारी यांचे पाठबळ असल्याने शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी टाेळ्यांचे वर्चस्व माेठ्या प्रमाणात सुरू झाले हाेते. या टाेळ्यांनी माेठे भूखंड वादग्रस्त करीत त्यावर ताबा मिळवणे, घर खाली करणे यासह खंडणी, जबरी वसुली करणे, व्यापारी व उद्याेजकांना धमकावण्याचे प्रकार प्रचंड वाढले हाेते. या प्रकरणाच्या तक्रारी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी कशाचीही हयगय न करता गुन्हेगारी टाेळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी कारवाईचा धडाकाच लावला आहे. त्यानुसार अकाेला पाेलीस दलाने कधी नव्हे; एवढ्या माेठ्या कारवाया केलेल्या आहेत. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रूजू झाल्यानंतर २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली असून, यामधील गुन्हेगारांचा आकडा हा तब्बल १००च्या वर असल्याची माहिती आहे, तर झाेपडपट्टीदादांना त्यांची जागा दाखविण्यासाठी एमपीडीएच्या कारवाया करून त्यांनाही पळता भुई थाेडी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टाेळ्यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती आहे. थेट दाेन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपारी, एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबध्दता आणि एमपीडीएच्या कारवायांचा सपाटा सुरू असल्याने गुन्हेगारांनी त्यांचे मार्ग बदलल्याचे वास्तव आहे.
जुने शहरातील टाेळीवर एसपींचा वाॅच
जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडांच्या टाेळ्या गत काही दिवसांपासून सक्रीय झाल्या आहेत. त्यांच्यावर खुद्द पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचाच वाॅच असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पाेलीस अधीक्षक या टाेळीचेही कंबरडे माेडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जुने शहरातील या टाेळीचा हैदाेस लक्षात घेता पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा पीडितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
९ प्रकरणात एमपीडीएचे अस्त्र उगारले
पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रूजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या सर्वाधिक एमपीडीएच्या कारवाया केलेल्या आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी त्यांनी एमपीडीएच्या ९ कारवाया केल्या असून, यासाेबतच गुंडांच्या २६ टाेळ्या जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करून गुन्हेगारांची हयगय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
आणखी दाेन टाेळ्या हद्दपार
रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणाऱ्या दाेन टाेळ्या बुधवारी हद्दपार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नीलेश विजय बाेरकर (रा. नवीन तारफैल) आणि पियुष पंढरीनाथ माेडक (रा. देशमुख फैल) या दाेघांच्या टाेळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. रामदास पेठ पाेलिसांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दाेन्ही टाेळ्यांना हद्दपार करण्याचा आदेश बुधवारी दिला.