अकोला जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये डेंग्यू, जलजन्य आजारांचे थैमान
By Admin | Updated: October 29, 2014 01:47 IST2014-10-29T01:47:26+5:302014-10-29T01:47:26+5:30
१५ जणांचा मृत्यू, १00 वर रुग्ण पॉझिटिव्ह.

अकोला जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये डेंग्यू, जलजन्य आजारांचे थैमान
सचिन राऊत/अकोला
वातावरणातील बदल आणि साचलेल्या पाण्यामध्ये झालेल्या डासांच्या उत्पत्तीने जिल्ह्यातील तब्बल २४७ गावांमध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश आजार आणि जलजन्य आजारांचे थैमान माजले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाने या गावांची तपासणी केली असून, ही सर्व गावे ह्यरेड झोनह्णमध्ये टाकण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील २४७ गावांत डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत जवळपास १५ जणांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये १00 हून अधिक रुग्णांच्या तपासणीत डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा प्रचंड उद्रेक झाला असताना आरोग्य विभागाने कागदोपत्रीच उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण भागात डास प्रतिबंधक धूरळणी व ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नसून, शहरातही प्रचंड घाण साचली आहे. या दोन्ही बाबींच्या परिणामी डासांची प्रचंड प्रमाणात उत्पत्ती होत असून, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. दरम्यान, २४७ गावांतील प्रत्येक दोन ते तीन घरांमागे एक डेंग्यूचा रुग्ण आढळून येत आहे. त्यामूळे अकोला शहर, आकोट व तेल्हारा तालुका आणि बाळापूर शहर ह्यरेड झोनह्णमध्ये टाकण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, तर नागरिकांनीही आपल्या घराच्या आजूबाजूला कचरा केला. गवत व इतर कचर्यामूळे डासांचे प्रमाण वाढत असून, परिणामी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. डासांपासून बचाव करण्याची गरज असून, आरोग्य विभागासोबतच नागरिकांनी साफसफाई ठेवल्यास या आजारावर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डेंग्यू आणि डेग्यूसदृश आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. यामधील बहुतांश रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळत असून, काहींना मात्र केवळ साधा ताप असल्याचेही समोर येत आहे डेंग्यू तापासोबतच व्हायरल ताप आणि अँलजिर्क तापाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामूळे ताप किंवा शरीरावर कुठेही सूज आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा अवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांनी केले आहे.