दलालांवर कारवाईची मागणी
By Admin | Updated: January 28, 2016 23:58 IST2016-01-28T23:58:16+5:302016-01-28T23:58:16+5:30
बनावट सही-शिक्क्याने २२१ वाहनांचे हस्तांतरण.

दलालांवर कारवाईची मागणी
अकोला : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क्य़ांच्या साहाय्याने २११ चारचाकी वाहनांचे हस्तांतरण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कृषी विद्यापीठ आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील संबंधित दलालांवर कारवाईची मागणी होत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ फेब्रुवारी ते ३0 जून २0१४ दरम्यान २११ चारचाकी वाहने एका मालकाने दुसर्याला विकल्याची नोंद आहे; परंतु या वाहनांचे हस्तांतरण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहायक कुलसचिव (समिती विभाग) आणि तेलबिया संशोधक विभागांच्या सहायक प्राध्यापकांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क्यांचा उपयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला आहे. वाहन हस्तांतरण नोंदीच्या फॉर्म २९ व ३0 वर साक्षांकन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क्यांचा उपयोग करण्यात आल्याचे कृषी विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दलालांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही कार्यालयातील दलालांवर शासनाची फसवणूक करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे राजेंद्र पातोडे यांनी तक्रार केली आहे. दलालांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता उपप्रादेशिक कार्यालयात दलालांमार्फत बनावट स्वाक्षरी व शिक्क्यांचा उपयोग करून २११ वाहनांचे हस्तांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दलालांचा हा प्रकार इतरही प्रकरणांमध्ये होत असून, उपप्रादेशिक कार्यालयात दलालांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.