Delhi thugs who cheating young woman of akola arested by police | युवतीची फसवणूक करणारे दिल्लीतील ठग जेरबंद

युवतीची फसवणूक करणारे दिल्लीतील ठग जेरबंद

अकोला: आदर्श कॉलनी येथील रहिवासी तसेच बी. कॉम.चे शिक्षण घेत असलेल्या युवतीची बिझनेस लोनच्या नावाखाली कर्ज मंजुरीसाठी ७८ हजार ५०० रुपयांनी आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील दोन ठगांना खदान पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विनोद संतासिंग चौहान आणि मोसम वासुराम दोघेही रा. जमनीया जिल्हा गाझीपूर दिल्ली असे अटक केलेल्या ठगांची नावे आहेत.
आदर्श कॉलनीतील काजोल हिने तिच्या मोबाइलवर बिझनेस लोन मिळेल का, म्हणून सर्च केले. तेव्हा तिला क्वीक अ‍ॅण्ड ईझी फायनान्स नावाची लिंक प्राप्त झाली. ती ओपन केल्यानंतर दुसºयाच दिवशी दिव्या नामक महिलेचा फोन आला. तुम्ही आमच्या लिंकला भेट दिली म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, असे दिव्याने काजोलला सांगितले. दिव्या नामक महिलेने काजोलच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर एक केवायसी फॉर्म पाठविला व तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आमिष दिले. तिने केवायसी फॉर्म भरून पुन्हा त्याच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला व मागणीनुसार आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुकचे फोटो पाठविले. फॉर्म फी म्हणून तिने दिलेल्या फिनो बँक खात्यामध्ये २४ जून रोजी तीन हजार रुपये भरले. त्यानंतर दिव्याने सांगितल्यानुसार तिच्या साहेबांचा व्हेरिफिकेशनसाठी काजोलला फोन आला. एक लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे त्याने सांगितले; मात्र लोनची ट्रान्सफर फी म्हणून २१ हजार रुपये भरावी लागेल. लोनसोबत ती रक्कम परत येईल, असा विश्वास दिला. यावर विश्वास बसल्याने काजोलने फिनो बँकेचे त्याच खात्यावर २१ हजार रुपये पुन्हा भरले. त्यानंतर त्याच रेफरन्सने बँक फायनान्स संदर्भात वेगवेगळे कारण देत ७८ हजार ५०० रुपये काजोलकडून उक ळण्यात आले. त्यानंतरही पुन्हा ‘एनओसी’साठी २६ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने काजोलला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत व फसवणुकीचे गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने एक पथक दिल्लीत तळ ठोकून बसले. त्यांनी येथील दोघांना ताब्यात घेऊन अकोल्यात आणले असता आरोपींनी पैसे उकळल्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Web Title: Delhi thugs who cheating young woman of akola arested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.