बाजारपेठेत व्यवहार मंदावले

By Admin | Updated: August 18, 2014 23:42 IST2014-08-18T23:13:27+5:302014-08-18T23:42:34+5:30

पाऊस लांबल्याचा परिणाम

Decrease in trading in the market | बाजारपेठेत व्यवहार मंदावले

बाजारपेठेत व्यवहार मंदावले

मोताळा : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मोताळा परिसरात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या प्रचंड गारपिटीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. रब्बी हंगाम हातातून गेल्यानंतर खरिपाची आशा असताना पावसाळा उलटण्याच्या मार्गावर आहे, परंतु एकदाही जोरदार पाऊस न झाल्याने पावसाअभावी कोमात गेलेल्या कोवळय़ा पिकांच्या होत असलेल्या नुकसानीमुळे बाजारपेठेतील व्यवहार सुस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. मोताळा तालुक्यात २२ जुलैची रात्र व २३ जुलैचा दिवसभराचा रिमझिम असा फक्त एकदाच पाऊस पडला आहे. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर पडलेल्या रिमझिम पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली. उगवून आलेली कोवळी पिके पावसाअभावी सुकू न जात आहे. पाऊस नसल्याने हिरवळ दिसत नसून जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळा उलटण्याच्या मार्गावर असतानासुद्धा शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसावरच सर्व व्यवहार अवलंबून असल्याने बाजारपेठेतही मंदी आल्याचे पाहावयास मिळत आहे. मोताळासह परिसरात हॉटेल्स, दवाखाने, किराणा, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, मोबाईल शॉपी, मोटारसायकल शोरूम, कापड दुकाने, कृषी केंद्र, कृषी उत्पन्न बाजार, बँका, एटीएम, शाळा, कॉलेज आदी सुविद्या मोताळय़ामध्ये आहेत. परंतु बाजारपेठ शेतकरी वर्गावर अवलंबून आहे. मागील काही महिन्यात अवकाळी पावसासह वादळ वार्‍यासह झालेल्या प्रचंड गारपिटीत तालुकाभरातील शेतकर्‍यांचे सात हजार हेक्टरच्यावर क्षेत्र बाधित होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतीमालाचे झालेले नुकसान, उशिरा झालेल्या पेरण्या व आता लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातात शिल्लक काही राहिलेले नाही. त्यामुळे राखून ठेवलेला पैसा खर्च झाला असून, थोड्याफार प्रमाणात शिल्लक असलेला पैसा खर्च करण्यात शेतकरी उदासीनता दाखवत आहे. परिणामी व्यापारी वर्गाला ग्राहकांची वाट पाहत दिवस काढावा लागत आहे. नवीन पीक हातात येईपर्यंत शेतकरी जवळचा पैसा राखून ठेवत असतो. मात्र तालुक्यात रब्बीच्या हंगामानंतर खरिपातसुद्धा पावसाने शेतकर्‍यांचा छळ सुरू केलेला दिसत असल्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला. परिणामी शेतकर्‍यांचे सर्व नियोजन कोलमडले आहे. पावसाअभावी मजुरांच्या हाताला काम नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकदाही समाधानकारक पाऊस आजपर्यंत झाला नाही. दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे भाजीपाल्यासह आवश्यक जीवनोपयोगी वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकदेखील बाजारात खरेदी करण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे. एरवी सकाळपासून रात्री साडेनऊपर्यंंत गर्दी असलेल्या बाजारपेठेत यावर्षी दिवसभर शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे विविध व्यवसायांवर मंदीचे सावट आहे.

Web Title: Decrease in trading in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.