पंधरा दिवसांत मृत्यूदरात पॉइंट ६ टक्क्यांची वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:13+5:302021-06-18T04:14:13+5:30
राज्यभरात १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला पॉझिटिव्हिटी रेटचा निकष लावण्यात आल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, ...

पंधरा दिवसांत मृत्यूदरात पॉइंट ६ टक्क्यांची वाढ!
राज्यभरात १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला पॉझिटिव्हिटी रेटचा निकष लावण्यात आल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, दुसरीकडे मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्ह्यातील मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील मृत्यूदर १.६ टक्क्यांवर होता तो आता वाढून २.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६.३ टक्के, तर पॉझिटिव्हिटी रेट ४.७४ टक्क्यांवर आहे. दोन्ही बाबी अकोलेकरांना दिलासा देणाऱ्या आहेत. मात्र, वाढता मृत्यूदर चिंता वाढविणारा आहे. उपचारादरम्यान मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल होताच अनेकांचा ४८ तासांत मृत्यू झाला आहे.
अशी आहे सध्याची स्थिती (टक्क्यांमध्ये)
पॉझिटिव्हिटी रेट - ४.७४
रिकव्हरी रेट - ९६.३
मृत्यूदर - २.२
दुसऱ्या लाटेत असे झाले चढ-उतार
दिवस - रिकव्हरी रेट - मृत्यूदर
१ फेब्रुवारी - ९३.३ - ३.१
१५ फेब्रुवारी - ९०.६ - २.९
१ मार्च - ७९.५ - २.४
१५ मार्च - ८२.६ - २
१ एप्रिल - ८४.३ - १.६
१ एप्रिल - ८८ - १.६
१ मे - ८६.९ - १.५
१५ मे - ८६.९ - १.६
१ जून - ९२.५ - १.६
१५ जून - ९६.३ - २.२
अनेकांचे लक्षणांकडे दुर्लक्ष
कोविडची चाचणी करावी लागेल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, या भीतीपोटी अनेक रुग्ण कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत घरगुती उपचारास प्राधान्य देतात. मात्र, त्यामुळे उपचारास उशीर होतो. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, त्यावेळी रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. त्यामुळे वेळीच कोविड चाचणी करून उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
कोविडच्या उपचारातील पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत. रुग्णांनी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. वेळेत उपचार झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला