पुण्यातील सीरममध्ये अकाेल्यातील अभियंत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:18 IST2021-01-23T04:18:41+5:302021-01-23T04:18:41+5:30
अकोला : देशभरात कोरोना लस पुरविणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक ...

पुण्यातील सीरममध्ये अकाेल्यातील अभियंत्याचा मृत्यू
अकोला : देशभरात कोरोना लस पुरविणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक मृत अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील ३० वर्षीय युवक आहे. महेंद्र प्रकाश इंगळे असे या मृत युवकाचे नाव आहे. ताे पुण्यातीलच प्राेनॅक नावाच्या कंपनीमध्ये कार्यरत असून, मेन्टेनन्स कामासाठी ताे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गेला हाेता. त्याचा मृतदेह चांदूर येथे आणल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
कोरोना लस निर्माण करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस तयार केली जाते, त्या विभागात ही आग लागली होती. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या लागल्या. दरम्यान, आगीत कोरोना लस प्लांट सुरक्षित असला, तरी इमारतीत अडकलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये अकोल्यातील महेंद्र इंगळे या युवकाचा समावेश आहे. याबाबतची माहिती मृत महेंद्रच्या कुटुंबीयांनी दिली. महेंद्र हा पुण्यातीलच दुसऱ्या एका कंपनीत कामाला होता. तेथून तो सर्व्हिस देण्यासाठी सीरम कंपनीत आला होता. याच वेळी तो आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. यातच त्याचा करुण अंत झाला. त्याचा मृतदेह पुण्याहून अकोल्याला आणण्यात येत असून, शुक्रवारी त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. मितभाषी महेंद्रचे दहावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यात झाले. त्यानंतर, वाशिम आणि इंजिनीअरिंगचे उच्च शिक्षण नागपूर येथे पूर्ण केले होते.
दीड वर्षांपूर्वी झाला हाेता विवाह
महेंद्र हा पुण्यातील प्राेनॅक इलेक्ट्रॉमेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. याच कंपनीत त्याला चार वर्षे पूर्ण झाली होते. महेंद्रचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले हाेते. गुरुवारी सीरम येथे तो बॅटरीच्या मेेन्टेनन्ससाठी गेला होता. या आगीत त्याचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. त्यांच्यामागे पत्नी, आईवडील असा परिवार आहे. महेंद्रचे वडील शेतकरी आहेत.