मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:29 PM2020-01-08T12:29:04+5:302020-01-08T12:29:15+5:30

पथदिव्यांची समस्या पाहता सत्ताधारी भाजप व प्रशासनाला देयक अदा करण्याची घाई का झाली होती, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Darkness under a lamp; Pay billions to the company | मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा

मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा

googlenewsNext

अकोला: मोठा गाजावाजा करीत सत्ताधारी भाजपने मार्च २०१९ मध्ये ‘ईईएसएल’ कंपनीसोबत एलईडी पथदिव्यांचा करारनामा केला. गत काही दिवसांपासून देयकाअभावी एलईडीचा पुरवठा करण्यास कंपनीने हात आखडता घेतल्यामुळे पथदिव्यांची उभारणी रखडली आहे. दुसरीकडे २० कोटी रुपयांतून उभारलेल्या एलईडी पथदिव्यांच्या बदल्यात मे. रॉयल कंपनीला सुमारे १७ कोटींपेक्षा अधिक देयक अदा करण्यात आले असले तरी नादुरुस्त पथदिव्यांची समस्या पाहता सत्ताधारी भाजप व प्रशासनाला देयक अदा करण्याची घाई का झाली होती, असा सवाल उपस्थित झाला आहे.
एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची निवड केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यावर खर्च होणारी वीज व त्याबदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा नसल्यामुळे कंपनीने ही जबाबदारी ‘मिडास’नामक कंपनीकडे सोपविली. सुरुवातीला काही दिवस मिडास आणि स्थानिक कंत्राटदारांमध्ये पथदिव्यांच्या दरावरून बिनसले होते. सदर प्रकरण निस्तरल्यानंतर गत काही दिवसांपासून कंपनीच्या स्तरावरून होणारा एलईडी पथदिव्यांचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. प्रभागात पथखांब उभारल्यानंतर त्यावर एलईडी लाइट नसल्यामुळे सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांच्या डोक्याला ताप लागला आहे.


खांब उभारले; पथदिवे कधी लावणार?

 सत्ताधारी भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी उत्साहाच्या भरात प्रभागांमध्ये खांब उभारले. एलईडी पथदिव्यांमुळे कसा उजेड पडेल, याचे नागरिकांकडे गुणगान केले.

 गत वर्षभरापासून सदर खांबांवर पथदिवे लागलेच नसल्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांची चांगलीच कोंडी होत आहे.

 सत्तेत असल्यामुळे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात पथदिव्यांचा मुहूर्त नेमका कधी निघतो, असा खोचक सवाल अकोलेकरांकडून विचारला जात आहे.


रॉयलच्या पथदिव्यांचा बोजवारा!
एलईडी पथदिव्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने १० कोटींचा निधी दिला होता. यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये जमा करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिवे उभारण्यासाठी मे. रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनी (पुणे)ची नियुक्ती केली. यामध्ये शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. एकीकडे एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले तरी दुसरीकडे गत काही दिवसांपासून रॉयल कंपनीने उभारलेल्या पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे.

Web Title: Darkness under a lamp; Pay billions to the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.