बाळापुरातील दाेन रेतीमाफियांना सहा वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:32+5:302021-02-05T06:17:32+5:30
अकाेला : बाळापूर तालुक्यातील गाजीपूर येथील तलाठी लाेहार व व पाेलीस कर्मचारी रवी गारवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सरकारी ...

बाळापुरातील दाेन रेतीमाफियांना सहा वर्षांचा कारावास
अकाेला : बाळापूर तालुक्यातील गाजीपूर येथील तलाठी लाेहार व व पाेलीस कर्मचारी रवी गारवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बापलेक रेतीमाफियांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठाेठावली.
गाजीपूर येथील तलाठी सतीश विश्वनाथ लोहार व त्यांच्यासाेबत असलेले पाेलीस कर्मचारी रविकुमार गारवे हे रेतीमाफियांवर कारवाई करण्यासाठी १९ सप्टेंबर २०१३ राेजी कार्यरत हाेते. यावेळी रेतीमाफिया अतिक जंगली ऊर्फ अतीक उर रहेमान व त्यांचा मुलगा नाजू या दाेघांनी तलाठी व पाेलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर त्यांचे रेतीचे वाहन नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र दाेघांनीही रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उड्या मारून स्वतःचा जीव वाचविला हाेता. या प्रकरणी बाळापूर पाेलीस ठाण्यात या बापलेक रेतीमाफियांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पाेलिसांनी करून दाेषाराेपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश पतंगे यांच्या न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतीक जंगली ऊर्फ अतीक उर रहेमान व त्यांचा मुलगा नाजू या दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ व ३०७ अन्वये दोषी ठरवित कलम ३५३अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा तर कलम ३०७अंतर्गत सहा वर्षांची शिक्षा सुनावली.