चौकीदाराच्या खुनातील आरोपी बाप-लेक कारागृहात
By Admin | Updated: May 23, 2017 01:17 IST2017-05-23T01:17:17+5:302017-05-23T01:17:17+5:30
अकोला: गोरक्षण रोडवरील ओम हाउसिंग सोसायटी येथील चौकीदाराची क्षुल्लक कारणावरून बॅटने हल्ला करीत हत्या करण्याऱ्या बाप-लेकाची न्यायालयाने सोमवारी कोठडीत रवानगी केली.

चौकीदाराच्या खुनातील आरोपी बाप-लेक कारागृहात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गोरक्षण रोडवरील ओम हाउसिंग सोसायटी येथील चौकीदाराची क्षुल्लक कारणावरून बॅटने हल्ला करीत हत्या करण्याऱ्या बाप-लेकाची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ओम हाउसिंग सोसायटी येथे शंकर केशव देशमुख (६१) हे चौकीदारीचे काम करतात. शुक्रवारी दुपारी ओम हाउसिंग सोसायटीसमोर प्रज्योत गजानन गवारे आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असताना प्रज्योतने टोलवलेला चेंडू ओम हाउसिंग सोसायटीच्या आवारात गेला. हा चेंडू आणण्यासाठी प्रज्योत ओम हाउसिंग सोसायटीत गेला असता येथील चौकीदार शंकर देशमुख यांनी त्याला हटकले. यावरून देशमुख आणि प्रज्योत या दोघांमध्ये वाद झाला. शंकर देशमुख का बोलले म्हणून प्रज्योतचे वडील गजानन गवारे हे घटनास्थळावर दाखल झाले. वाद वाढल्याने प्रज्योतने शंकर देशमुख यांच्या डोक्यावर बॅटने हल्ला चढविला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खदान पोलिसांनी प्रज्योत गवारे आणि त्याचे वडील गजानन गवारे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.