लोतखेड येथेही शेतात गांजाच्या झाडाची लागवड; विशेष पथकाची दुसऱ्यांदा कारवाई
By नितिन गव्हाळे | Updated: September 22, 2022 18:10 IST2022-09-22T18:08:55+5:302022-09-22T18:10:14+5:30
गांजाचे झाड जप्त

लोतखेड येथेही शेतात गांजाच्या झाडाची लागवड; विशेष पथकाची दुसऱ्यांदा कारवाई
अकोला: अकोट येथे घरासमोरील अंगणात गांजाचे झाड जप्त केल्यानंतर दोन दिवसांनीच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोतखेड येथे एका शेतात चक्क प्रतिबंधित मादक अंमली पदार्थ गांजाचे झाड आढळून आले. पोलिसांनी सहा फूटाचे गांजाचे झाड जप्त केले असून, आरोपीस अटक केली आहे.
विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना, लोतखेड येथे शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली असता, त्यांनी पथकासह पद्माकर श्रीकृष्ण ठाकरे यांच्या शेतात छापा घातला. ठाकरे यांच्या नोकराने शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे आढळून आले. त्यांचा नोकर या गांजाच्या झाडाची देखभाल करून त्या गांजाचे तेथे सेवन करण्यासोबतच विक्रीही करायचा.
पोलिसांनी पद्माकर ठाकरे यांच्या शेतातील सहा फूटाचे गांजाचे झाड, वजन एक किलो किंमत दहा हजार जप्त केले. पोलिसांनी आरोपी पद्माकर ठाकरे व त्याचा नोकर सुनील ज्ञानदेवराव वसू(रा. लोतखेड) यांच्याविरूद्ध दहीहांडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम २० ब नुसार गुन्हा दाखल केला.