सीएसडी कँटिन माजी सैनिकांच्या सेवेत रुजू
By Admin | Updated: May 19, 2014 21:13 IST2014-05-19T19:18:04+5:302014-05-19T21:13:50+5:30
अकोला येथे सीएसडी कँटिनचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एस. पी. पाटील (वायएसएम) यांच्या हस्ते लोकार्पण

सीएसडी कँटिन माजी सैनिकांच्या सेवेत रुजू
अकोला : स्थानिक मुंगीलाल बाजोरिया विद्यालयामागील माजी सैनिकांच्या विश्रामगृहात थाटण्यात आलेल्या सीएसडी कँटिनचे सोमवारी दुपारी १२.३0 वाजता अमरावती विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एस. पी. पाटील (वायएसएम) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी अकोला ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर ए.जी. चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, जिल्हा कल्याण संघटक सुभेदार प्रकाश शेगावकर, सुभेदार मेजर बाबर, कँटिनचे जेसीओ सुभेदार जगविंदरसिंग, सदाशिव भालेराव यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना वस्तू, सेवेचा लाभ घेता यावा यासाठी अकोल्यात कायमस्वरूपी सीएसडी कँटिन व्हावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी जोर धरून होती. माजी सैनिकांच्या कल्याणार्थ सतत प्रयत्न करणार्या पदाधिकार्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, स्थानिक मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या माजी सैनिक विश्रामगृहात सीएसडी कँटिन थाटण्यात आले आहे. यामुळे माजी सैनिकांना पूर्वीप्रमाणे अमरावतीपर्यंत करावी लागणारी पायपीट आता थांबणार आहे. नुकताच मुंबई येथून पाठविण्यात आलेल्या गृहोपयोगी वस्तूंचा साठा या कँटिनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आला असून, प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या कँटिनचा लाभ अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना घेता येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.