मूर्तिजापुरात पुन्हा कावळा मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:11+5:302021-02-06T04:32:11+5:30
सकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील पोळा चौकातील गजानन महाराज फलकाजवळ एक कावळा मृतावस्थेत, तर दुसरा अत्यवस्थ स्थितीत आढळून आला. ...

मूर्तिजापुरात पुन्हा कावळा मृतावस्थेत आढळला
सकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील पोळा चौकातील गजानन महाराज फलकाजवळ एक कावळा मृतावस्थेत, तर दुसरा अत्यवस्थ स्थितीत आढळून आला.
मृत झालेला कावळा वनविभागाच्या साहाय्याने येथील पशुलघुचिकित्सालयात ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत शहराच्या परिसरात ४ चिमण्या व पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. मृत चिमण्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. बी. जावरकर यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात एक कावळा मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचबरोबर स्टेट बँक मागे राहत असलेले डी. एस. वानखडे यांच्या घराच्या आवारात आजारी बगळा दिसून आला. शहराच्या परिसरातील अनेक पक्षी आजारी व मृतावस्थेत दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्याच्या प्रयोगशाळेत जिल्हाभरातून मृत पक्षी येत आहेत. त्यामुळे काही पक्षी इतरत्र प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. मूर्तिजापूर येथील मृत चिमण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मृत कावळे मूर्तिजापूर लघुचिकित्सालयात ठेवण्यात आले आहेत.
- डॉ. आर.बी. जावरकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मूर्तिजापूर