पश्चिम व-हाडात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 1, 2015 21:11 IST2015-03-01T21:11:10+5:302015-03-01T21:11:10+5:30
अकोला जिल्ह्यात रविवार सकाळपर्यंत १९.२९ मिलीमीटर तर वाशिम जिल्ह्यात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद.

पश्चिम व-हाडात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
अकोला : गत तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर पश्चिम वर्हाडात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. रविवारी दुपारपर्यंत पाऊस सुरुच होता. अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पीक उद्ध्वस्त झाले. पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पिकांना बसला. रविवारी पहाटेही अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला. बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, आकोट व तेल्हारा तालुक्यातील पिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला. शेतात सोंगून ठेवलेल्या तूरीचे अतोनात नुकसान झाले. वाडेगाव परिसरातील निंबू बागांचेही प्रचंड नुकसान झाले. पातूर आणि बाळापूर तालुक्यातील आंब्यांचा मोहरही झडला. अकोला जिलत सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १९.२९ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली होती.
बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. आंब्यासह फळबागांचेही नुकसान झाले आहे. रविवारीही दिवसभर सुरूच होता. बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा मोताळा, लोणार, सिंदखेडराजा तसेच मेहकर तालुक्यातील काही भागात पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या भागात पिकांचे नुकसान जास्त आहे. वादळी वार्यामुळे विद्युत तार तुटल्याने शॉक लागून माळविहिरी शिवारातील एका म्हशीचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारपासूनच वातावरणात अचानक बदल झाला आणि सायंकाळनंतर वादळी पावसाला सुरूवात झाली. १ मार्च रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुके मिळून एकूण ७१ मीमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात १८ मीमी तर त्याखालोखाल रिसोड १५ मीमी, मंगरुळपीर १४ मीमी, मानोरा ११ मीमी, वाशिम १0 मीमी आणि सर्वात कमी मालेगाव तालुक्यात तीन मीमी पाऊस पडल्याची नोंद आहे. अवकाळी पावसामुळे गहु, हरभरा, कांदा बिजवाई, संत्रा व आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.