आकाश उमाळे
अंदुरा : बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या अंदुरा परिसरात जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. पेरणी झाल्यानंतर बियाणे उगवले होते; मात्र पावसाने दडी दिल्याने परिसरातील ३०० ते ४०० एकर शेतजमिनीवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दुबार पेरणीसाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज, खासगी कर्ज, उसनवारी करून शेतात पेरणी केली. सुरुवातीला आलेल्या पावसामुळे बियाणे अंकुरले; मात्र त्यानंतर पावसाने दडी दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. याकडे शासनाने लक्ष देऊन परिसरात नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी संजय घंगाळे, अनंता शिंगोलकार, गजानन बेंडे, प्रभाकर शिंगोलकार, राजू बेंडे, वैभव उगले, सहदेव भोजने, सुधाकर शिंगोलकार, राजेंद्र घंगाळे, बंडू बेंडे, प्रमोद रोहणकर, विजय रोहणकर, संतोष नागोलकार, संतोष भगत, अंकुश अवचार, गोपाल वराळे, अनंता गावंडे, अनिल शिंगोलकार, दीपक शिंगोलकार, मंगेश वानखडे, आदींनी केली आहे.
----------------------
या भागाला सर्वाधिक फटका
अंदुरा परिसरातील अंदुरा भाग एक, भाग दोन, सोनाळा, बोरगाव, हातरुण, नया अंदुरा, कारंजा रम, हाता, आदी गावांत सर्वाधिक फटका बसला आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा लहरीपणा दाखवीत तब्बल २० दिवस दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, पिके करपली आहेत. या परिसरातील ३०० ते ४०० एकरांवरील पेरण्या उलटण्याची शक्यता आहे.
----------------------
जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भवशावर मी माझ्या २५ एकर शेतीत सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांची पेरणी केली होती. परंतु पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे.
- संजय घंगाळे, शेतकरी, अंदुरा.