विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: May 27, 2017 00:49 IST2017-05-27T00:49:23+5:302017-05-27T00:49:23+5:30
अकोला: कॅटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीवर डोळा ठेवून तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणाऱ्या विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध खदान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे.

विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कॅटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीवर डोळा ठेवून तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणाऱ्या विकृत पतीसह सहा जणांविरुद्ध खदान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे. गत एका वर्षापूर्वी जेतवननगर येथील या युवतीने पोलिसात तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्याने या युवतीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
खडकी येथील रहिवासी शुभम दिनेश गोयल याने जेतवन नगरमधील एका युवतीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला; मात्र युवतीने सदर युवकाला लग्न करण्यास नकार दिला; मात्र युवकाने त्यानंतर त्याची आई अंजली दिनेश गोयल, त्याचे मित्र संजय पेटले, सुमेध वाघमारे, खुशाल गव्हाळे आणि अमोल कुरील या सर्वांनी युवतीवर दबाव आणून तिला शुभम गोयल याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. या सहा जणांच्या दबावाला बळी पडत युवतीने शुभमशी विवाह केला; मात्र लग्नानंतर त्याने पत्नीवर जबरी संभोग करणे, विकृत मानसिकतेतून तिचा वेगळ्या प्रकारे शारीरिक छळ करणे, नागरिकांसमोर विविध इशारे करणे, मद्यप्राशन करून तसेच अमली पदार्थाचे सेवन करून छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने पत्नीला आत्महत्येची धमकी देत पुन्हा छळ सुरूच ठेवला. अखेर काहीही झाले तरी चालेल या अखेरच्या स्तरावर जात युवतीने त्याला सोडले; मात्र छळ सुरूच असल्याने या प्रकरणाची तक्रार तिने खदान पोलिसात केली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खदान पोलिसांनी शुभम गोयल, अंजली गोयल व त्याच्या चार मित्रांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७७, ३५४, ४२७, ४२०, २९४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.