The court challenges the selection of MLA Prakash Bharsakale | आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

अकोला : जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकळे विजयी झाले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार एका व्यक्तीला दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत नाव नोंदणी करता येत नाही; मात्र आ. प्रकाश भारसाकळे यांचे नाव अकोट आणि दर्यापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत नोंदविण्यात आले आहे. तसेच अकोट नगरपालिका क्षेत्रात १३०-ब क्रमांकाचे घर असून, अकोट येथील रहिवासी असल्याचे आ. भारसाकळे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे; परंतु प्रत्यक्षात अकोट नगरपालिका क्षेत्रात १३०-ब क्रमांकाचे घर उपलब्धच नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवार असल्याचे दर्शवून आ. भारसाकळे यांनी दिशाभूल केली, असा आरोप करीत अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. संदीप चोपडे (नागपूर) काम पाहत आहेत.

आ. भारसाकळे यांनी असे दाखविले रहिवासी पत्ते!
आ. प्रकाश भारसाकळे यांनी २००९ मध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी अकोट नगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पत्ता दाखविला. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांनी अकोट मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी दर्यापूर तालुक्यातील बानोसा येथील रहिवासी असल्याचा पत्ता दाखविला आणि २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी अकोट येथील रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्रात दिले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही. यासंदर्भात न्यायालयातच पुरावे देईल.
- प्रकाश भारसाकळे, आमदार.

 

 

Web Title: The court challenges the selection of MLA Prakash Bharsakale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.