कापसाचे उत्पादन पोहोचणार ९0 लाख गाठींपर्यंत
By Admin | Updated: January 9, 2015 01:20 IST2015-01-09T01:20:29+5:302015-01-09T01:20:29+5:30
तज्ज्ञांचा अंदाज, संक्रांतीनंतर वाढेल आवक.

कापसाचे उत्पादन पोहोचणार ९0 लाख गाठींपर्यंत
अकोला : राज्यात ८५ लाख कापूस गाठींचे उत्पादन अपेक्षित होते; परंतु अवकाळी पावसामुळे या उत्पादनात आठ ते दहा टक्के वाढ होऊन, हे उत्पादन ९0 लाख गाठीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संक्रांतीनंतर बाजारात कापसाची आवक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गत खरीप हंगामात राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी करण्यात आली होती. विदर्भात १७ लाख हेक्टरच्यावर कापसाचे क्षेत्र आहे; पण खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. असे असले तरी ८५ लाख कापूस गाठी उत्पादन अपेक्षित धरण्यात आले आहे. गत आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या आठवड्यात अकोला जिल्हय़ात एकाच दिवशी ५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे कापूस झांडाना पुन्हा जीवदान मिळाले असून, अनेक ठिकाणी हे पीक पुन्हा फुलोर्यावर येत आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, कापसाचे उत्पादन आठ ते दहा टक्कय़ांनी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात शनिवारपर्यंत ६१ लाख क्विंटल कापूस शेतकर्यांनी विकला असून, यातील २६ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे; पण सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे कापूस दर प्रतवारीच्या निकषावर ठरले असल्याने शेतकर्यांना हमी दरापेक्षा प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये कमी दर दिले जात आहेत. परिणामी शेतकर्यांचा ओढा खासगी बाजाराकडे आहे. असे असले तरी कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेवर सधन शेतकर्यांनी अद्याप कापूस विकण्यासाठी काढलेला नाही. आतापर्यंत बाजारात जो कापूस विकण्यात आला आहे, तो मुख्यत्वे अल्पभूधारक शेतकर्यांचा आहे. संक्रांतीनंतर मात्र बाजारपेठेत कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे.
फरदडीला कापूस येतोच. आता फुलोरा आला असेल, तर शेतकर्यांना त्यासाठी रसशोषण किडी, मावा आदीबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्नद्रव्यासाठी डीएपी, युरियाची फवारणी करणे क्रमप्राप्त असल्याचे जेष्ठ कापूस संशोधक डॉ. आदीनाथ पसलावार यांनी स्पष्ट केले.
*फरदडीला कापूस येतो
२0१२-१३ मध्ये अवकाळी पाऊस आल्यानंतर, त्यावर्षी फरदडपासून शेतकर्यांना दोन ते तीन क्विंटल कापसाचे उत्पादन वाढले होते. यावर्षीदेखील अवकाळी पाऊस झाल्याने, उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.