हमीभावाने मोडले कापूस उत्पादक शेतक-यांचे कंबरडे!
By Admin | Updated: November 16, 2014 23:43 IST2014-11-16T23:43:45+5:302014-11-16T23:43:45+5:30
बाजारात भाव पडले; सामाजिक सुरक्षितता म्हणून शासनाने हमी घ्यावी.
_ns.jpg)
हमीभावाने मोडले कापूस उत्पादक शेतक-यांचे कंबरडे!
राजरत्न सिरसाट/ अकोला
केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकर्यांना निराशेच्या गर्तेत टाकले असून, बाजारातही कापसाचे सरासरी भाव ३९00 ते ३९५0 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे सरकले नसल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहे; पण येथेही कमी आणि जास्त लांबीच्या धाग्याचे निकष लावून ४0५0 रूपयांपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने या शेतकर्यांची सामाजिक सुरक्षितता म्हणून हमी घेण्याची गरज आहे.
केंद्रीय कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी कापसाला हमीभाव (एमएसपी) जाहीर केले आहेत. यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला ३९00 रुपये ते ३९५0 रुपये प्रति क्विंटल भाव असून, लांब धाग्याच्या कापसाला ४0५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केले आहेत; परंतु अल्प पावसामुळे यावर्षी विदर्भ, मराठवाड्यातील कापसाचे उत्पादन घटले असून, एकरी दोन ते तीन क्विंटलपेक्षा कमी उतारा आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावात तर उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
राज्यात यावर्षी कापूस क्षेत्र घटले आहे. विदर्भात हे क्षेत्र १८ लाखाहून १२ लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. पूरक पाऊस नसल्याने यावर्षी कापूस पिकावर दुष्परिणाम झाला आहे. या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने सामाजिक सुरक्षितता म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेल्या हमी भावापेक्षा २५ ते ३0 टक्के रक्कम राज्य शासनाने वाढवून दिल्यास शेतकर्यांना दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सर्वच वस्तूचे भाव वाढतात, मग कापसाचे का नाही? शेतकर्यांवर सतत अन्याय होत आहे. यावर्षी तर पाऊसही नव्हता. त्यामुळे मूग, सोयाबीनसह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने सामाजिक सुरक्षितता म्हणून कापसाचे भाव वाढवून द्यावे, अशी मागणी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी केली आहे.
*सीसीआयची खरेदी
भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी सुरू केली असून, अकोला जिल्हय़ातील आकोट येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे; पण सीसीआयनेदेखील कापसाचा धागा बघून, ३९00 ते ३९५0 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव दिले.
*निर्यात घटणार!
भारतातील कापसासाठी चीन हा मोठा आयातदार देश आहे; पण गतवर्षीचा कापूस चीनकडे शिल्लक असल्याने यावर्षी त्यांच्याकडून मागणी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला भाव नसल्याने येथील कापसाचे भाव पडले आहेत. याचा फटकाही यावर्षी शेतकर्यांना बसणार आहे.