Coronavirus : अकोल्यात सात जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 15:48 IST2020-04-23T15:13:07+5:302020-04-23T15:48:08+5:30

पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त घोषित करून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली.

Coronavirus: Seven cured from coronavirus in Akola, discharged from hospital |  Coronavirus : अकोल्यात सात जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

 Coronavirus : अकोल्यात सात जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

ठळक मुद्देगुरुवारी सुटी देण्यात आलेले सर्व सातही रुग्ण पातूर येथील आहेत. सातही रुग्णांना त्यांच्या घरातच ‘क्वारंटिन’ ठेवण्यात येणार आहे.

अकोला : एकापाठोपाठ एक कोरोनाचे १६ रूग्ण आढळून आल्यानंतर अकोला शहर व जिल्हा कोरोचा हॉटस्पॉट बनतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली असताना, गत चार दिवसांपासून अकोलेकरांना सुखद बातम्या मिळत आहेत. गत तीन दिवसांत ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गुरुवारी पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त घोषित करून त्यांना सर्व वैद्यकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली.  दरम्यान, फेरतपासणीमध्ये चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढविली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १६ होती. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता,तर एका रुग्णाने आत्महत्या केली होती. 

गुरुवारी सुटी देण्यात आलेले सर्व सातही रुग्ण पातूर येथील आहेत. त्यांच्या तिसऱ्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना बुधवारी कोरोनामुक्त घोषित करण्यात येईल अशी अपेक्षा असताना, काही वैद्यकीय सोपस्कार बाकी असल्यामुळे त्यांना गुरुवारी कोरोनामुक्त घोषित करण्यात येऊन सुटी देण्यात आली. आता या सातही रुग्णांना त्यांच्या घरातच ‘क्वारंटिन’ ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या रुग्णांना सुटी देण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,   प्रा. संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

चार रूग्णांचे फेरतपासणीचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

चार रूग्णांचे फेरतपासणीचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. हे चारही रुग्ण अकोल्यताली अकोटफैल, बैदपुरा परिसरातील रहिवासी आहेत. यासह मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या १४ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी आणि बैदपुरा परिसरातील रहिवासी तीन वर्षीय चिमुकल्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील सात रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Coronavirus: Seven cured from coronavirus in Akola, discharged from hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.