CoronaVirus: ऑर्गन फेल्युअर ठरतेय मृत्यूचे कारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:22 IST2020-08-14T13:22:21+5:302020-08-14T13:22:28+5:30
रुग्णांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो आणि तेथूनच आॅर्गन फेल्युअरची साखळी सुरू होते. हीच साखळी पुढे मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो.

CoronaVirus: ऑर्गन फेल्युअर ठरतेय मृत्यूचे कारण!
अकोला : बहुतांश रुग्ण प्रकृती जास्त बिघडल्यावर रुग्णालयात येतात. तोपर्यंत रुग्णांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो आणि तेथूनच आॅर्गन फेल्युअरची साखळी सुरू होते. हीच साखळी पुढे मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाविषयी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी बहुतांश लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. सर्दी, खोकला आणि ताप असला तरी त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते; मात्र जेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुप्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुप्फुसाचे लोब खराब झालेले असतात. येथूनच ‘आॅर्गन फेल्युअर’ची साखळी सुरू होते. बहुतांश रुग्णांवर उपचार सुरू होईपर्यंत त्यांचे फुप्फुस निकामी होते. त्यानंतर यकृत, किडनी, मूत्रपिंड यासारखे महत्त्वाचे अवयव निकामी होण्यास सुरुवात होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी थेट वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
९० टक्के रुग्ण घेतात उशिरा उपचार
रुग्णालयात दाखल होणारे ९० टक्के रुग्ण हे सर्दी, खोकला येऊन गेल्यावर जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रुग्ण दाखल होतो, तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
तर वाचू शकतात प्राण!
रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असली, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो; पण कोरोनामुळे अवयव निकामी होण्यास सुरुवात होण्यापूर्वीच उपचारास सुरुवात केल्यास प्राण वाचू शकतात. रुग्णाला सर्दी, खोकला होताच वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
जवळपास ९० टक्के रुग्ण उशिरा उपचारास सुरुवात करतात. तोपर्यंत त्यांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम झालेला असतो. अनेकांचे फुप्फुस निकामी होण्यास सुरुवात झालेली असते. आॅर्गन फेल्युअरला सुरुवात झाल्यानंतर रुग्णाचे प्राण वाचविणे अशक्य होते. त्यामुळे नागरिकांनी वेळेतच रुग्णालयात दाखल व्हावे.
- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला