Coronavirus : अकोल्यात कोरोनाबधितांचा आकडा ३०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:38 IST2020-05-20T18:37:42+5:302020-05-20T18:38:05+5:30
कोरोनाबधितांचा आकडा ३०८ झाला आहे.

Coronavirus : अकोल्यात कोरोनाबधितांचा आकडा ३०० पार
अकोला : गत चार दिवसांत शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली असून, बुधवारी बाधितांचा आकडा ३०८ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे आता शहरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या ९० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली नाहीत. अशा परिस्थितीत अकोलेकरांना कोरोनाच्या सायलेंट कॅरिअरपासून सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे शहरात चौफेर कोरोनाचं जाळं पसरलं आहे. बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी तीन गीतानगर, दोन ताजनापेठ, दोन आश्रयनगर डाबकीरोड, तर रणपिसेनगर, गुलजारपुरा, न्यू खेताननगर कौलखेड रोड, आळसी प्लॉट, कच्ची खोली सिंधी कॅम्प, खोलेश्वर, महात्मा गांधी मिल रोड सेंट्रल वेअर हाऊसिंग जवळ, भीमचौक अकोट फैल, तेलीपुरा चौक इमानदार प्लॉट, अकोट फैल, माळीपुरा, पंचशिलनगर वाशिम बायपास रोड, नानकनगर निमवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी दोन न्यू तारफैल, दोन जण समतानगर येथील रहिवासी आहेत. तसेच उर्वरीत खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मीनगर, देशमुख फैल, अडगाव (ता.अकोट) , पुरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत. तर २३ जणांनी कोरोनावर मात केली असून, मंगळवारी रात्री त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १९ जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता १२१ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
२१८ अहवाल निगेटिव्ह
कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या प्रलंबित अहवालापैकी २४७ अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह , तर २१८ अहवाल निगेटिव्ह आले.
अशी आहे स्थिती
एकूण कोरोनाबाधित रुग्ण - ३०८
अॅक्टिव्ह रूग्ण - १२१
मृत्यू झालेले रुग्ण - २० (एकाची आत्महत्या)
कोरोनामुक्त - १६७