CoronaVirus In Akola : सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:57 IST2020-03-31T16:56:31+5:302020-03-31T16:57:52+5:30
मंगळवारी शहरातील विविध मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसली तर भाजीपाला, किराणा, खरेदीसाठीची गर्दीही कायमच होती.

CoronaVirus In Akola : सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा!
अकोला : संपूर्ण जगाला घाबरवून सोडलेल्या कोरोना या विषाणूमुळे शेजारच्या बुलडाण्यात बळी गेला. मंगळवारी आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हा विषाणू आपल्या शेजारी संक्रमणाचा तिसरा टप्पा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाही काही अतिउत्साही अकोलेकर महाभाग मात्र हा धोका ओळखायला तयार नाहीत. मंगळवारी शहरातील विविध मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसली तर भाजीपाला, किराणा, खरेदीसाठीची गर्दीही कायमच होती. या सर्व प्रकारामुळे सोशल डिस्टंसिंग या उपाययोजनेचे तीन तेरा झाल्याचे चित्र आहे.
कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या आजारावर अद्यापही औषध अथवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे हाच सध्याच्या घडीला त्यावरील उपाय आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्या परिने प्रयत्न करीत आहेत; परंतु दुर्दैवाने जगातील परिस्थिती समोर दिसत असतानाही, बहुतांश अकोलेकर गंभीर नाहीत. विलगीकरण (क्वारंटीन), एकमेकांपासून अंतर राखणे (सोशल डिस्टंसिंग), सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, याकडे दुर्लक्ष करण्याकडेच बहुतांश नागरिकांचा कल आहे. सध्याच्या घडीला अकोल्यातील कोरोनाचा संशयीत ‘निगेटिव्ह’ येत असल्यानेच बहुधा नागरिक कोरोनासंदर्भात पुरेसे गंभीर दिसत नाहीत; मात्र ही बेफीकरवृत्ती अशीच राहिली तर आपली अवस्था अतिशय बिकट होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच अन् कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहोचल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे, त्यामुळे केवळ प्रशासनाच्याच भरवशावर न बसता नागरिकांनी गांभिर्य पाळण्याची गरज आहे.