CoronaVirus in Akola: Citizens Buy 'Hydroxy Chloroquine' Without a Doctor's Note! | CoronaVirus in Akola : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिक खरेदी करताहेत ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’!

CoronaVirus in Akola : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिक खरेदी करताहेत ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’!

अकोला: कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती कायम राखण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरीक्विन’ औषध घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे; मात्र ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच अकोलेकरांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच ही औषध खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाºयांनी डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचारी गरजेनुसार, ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ या औषधाचा उपयोग करूशकतात; पण ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अनेकांनी त्याचे फायदे, तोटे न जाणता ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’च्या गोळ्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, दवा बाजारात या औषधांचा तुटवडा उद्भवला आहे. शिवाय, गरजू रुग्णांना ही औषधे मिळत नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जात नसल्याने, अनेकांनी कौटुंबिक डॉक्टरांच्या चिठ्ठीचा आधार घेतल्याचेही वास्तव आहे. काहींनी अव्वाच्या सव्वा दराने थेट औषध दुकानदारांकडूनच खरेदी केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. परिणामी, शहरातील अनेक दुकानांतील औषधे संपली असून, खरेच गरज असलेल्या रुग्णांना ही औषधे मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

यांच्या आरोग्याला धोका
वृद्ध, मधुमेह, हृदयरुग्णांसह इतर जोखमेतील व्यक्तींनी या गोळ्यांचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

या रुग्णांना दिले जाते हे औषध!
हिवताप, जॉइंट पेन, कुष्ठरुग्णांना आलेली रिअ‍ॅक्शनसह इतर काही संवर्गातील रुग्णांना डॉक्टर आवश्यक्तेनुसार ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ २०० एमजी किंवा ४०० एमजी, तसेच इतर औषध घेण्याचा सल्ला त्यांच्या शरीरयष्टी आणि आरोग्याच्या दृष्टीने देतात.


‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’औषधचा उपयोग प्रामुख्याने हिवतापावर उपचार किंवा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केला जातो. दरम्यान ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनानंतर हे औषध कोरोनाग्रस्तांचा उपचार करणाºया डॉक्टरांना घेण्याचा सल्ला तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे; परंतु अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांची खरेदी केल्याने त्याचा तुटवडा आहे. नागरिकांनी या गोळ्या औषध दुकानात परत कराव्यात.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: CoronaVirus in Akola: Citizens Buy 'Hydroxy Chloroquine' Without a Doctor's Note!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.