भाजपमधील कलहावर काँग्रेसचे बोट

By Admin | Updated: May 23, 2017 01:00 IST2017-05-23T01:00:41+5:302017-05-23T01:00:41+5:30

अकोला: भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी बोट ठेवले आहे.

Congress's boat on BJP's coterie | भाजपमधील कलहावर काँग्रेसचे बोट

भाजपमधील कलहावर काँग्रेसचे बोट

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी बोट ठेवले आहे. खासदार आणि पालकमंत्र्यांमधील वादाचा शहरातील विकास कामांवर परिणाम व्हायला नको, अशी अपेक्षा साजिद खान यांनी महापौर विजय अग्रवाल यांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे.
भाजपमध्ये मागील अनेक दिवसांपासून गटातटाचे राजकारण रंगले आहे. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर आणि पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातील गटातटाचे राजकारण सर्वश्रुत आहे.
प्रशासकीय यंत्रणांनी आयोजित के लेल्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटातील धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. मध्यंतरी शहरात एलईडी पथदिव्यांच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपमध्ये महाभारत छेडल्या गेल्याचे अकोलेकरांनी पाहिले. एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणाऱ्या आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या नावाचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेख नसल्यामुळे मोठा गहजब झाला होता.
हा कार्यक्रम प्रशासकीय असल्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधींचा रोष महापालिका प्रशासनासह महापौरांवरदेखील होता. मागील काही दिवसांपासून राजकीय मुद्यांच्या शोधात असलेल्या काँग्रेसने भाजपमधील अंतर्गत कलहावर बोट ठेवत शहर विकासाच्या आड वादावादी येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनपातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी महापौर विजय अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रात पक्षातील अंतर्गत वादाचा शहर विकासावर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा वजा सूचना केली आहे.

विरोधी पक्षनेता साजिद खान यांचे पत्र कार्यालयात आल्याची माहिती आहे. भाजपमधील अंतर्गत कलहाची काळजी करण्यापेक्षा काँग्रेसने स्वपक्षाच्या वर्तमान स्थितीकडे लक्ष दिल्यास बरे होईल. शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असून, विकास कामे होतीलच, त्याची काळजी काँग्रेसने करण्याचे कारण नाही.
- विजय अग्रवाल, महापौर

Web Title: Congress's boat on BJP's coterie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.