मूलभूत समस्यांच्या मुद्यावर काँग्रेसचा हल्लाबोल!
By Admin | Updated: November 21, 2014 02:18 IST2014-11-21T02:18:02+5:302014-11-21T02:18:02+5:30
महापालिकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची कोंडी; सभा स्थगित

मूलभूत समस्यांच्या मुद्यावर काँग्रेसचा हल्लाबोल!
अकोला: एकीकडे शहरात घाण व कचर्याचे ढीग साचल्यामुळे विविध आजारांची साथ पसरली असून, मूलभूत सुविधांची पुरती दाणादाण उडाली आहे, तर दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून सत्तापक्ष व प्रशासकीय यंत्रणा अकोलेकरांच्या डोळ्य़ात धूळफेक करीत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधार्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या मुद्यावरून सत्तापक्ष व प्रशासनाची झालेली कोंडी, प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची सभेतील अनुपस्थिती लक्षात घेता, काही मोजके प्रस्ताव पारित केल्यानंतर सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी घेतला.
सत्तापक्ष भाजप, शिवसेनेच्यावतीने पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन मनपाच्या मुख्य सभागृहात करण्यात आले होते. महापौर उज्ज्वला देशमुख पहिल्याच सभेला ३0 मिनिटांनी उशिरा उपस्थित झाल्या. यावेळी माजी महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासनाकडून प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्यासह उपायुक्त दयानंद चिंचोलीकर सभेला अनुपस्थित असल्याने चर्चा कोणासोबत करणार, असा कळीचा मुद्दा खुद्द शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके यांनी उपस्थित केला. विषय सूचीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वारासाठी निधीच्या तरतुदीच्या मुद्यावरून नगरसेवक सतीश ढगे यांनी प्रशासनासह महापौरांना घरचा आहेर दिला. प्रवेशद्वाराच्या विषयावर केवळ चर्चा होत असून, प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होत नाही. सर्वांच्या मनात प्रवेशद्वार तयार करण्याची इच्छा असेल तरच ठोस निर्णय घ्या, अन्यथा आश्वासने बंद करण्याचे परखड मत त्यांनी मांडले. हा धागा पकडून काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, दिलीप देशमुख, साजीद खान, रिजवाना शेख, राकाँचे मो.फजलू पहेलवान यांनी प्रशासन व सत्ताधार्यांवर कडाडून हल्लाबोल केला. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले असून, हातपंप बंद आहेत. ज्या भागात जलवाहिनी नाही, त्या भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला असून, पथदिवे, स्वच्छता आदी सुविधा कोलमडल्या आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्याची दुरवस्था झाली असून, काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या निधीतून नियमबाह्यपणे ई-निविदेद्वारे कामे करण्याचा घाट प्रशासनाने रचला. प्रशासनाच्या मनमानीला सत्ताधार्यांची साथ असल्याचा आरोप मदन भरगड, साजीद खान यांनी केला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर गोरगरीब लघु व्यावसायिकांचे साहित्य जप्त करून त्यांची तोडफोड करीत आहेत. साफसफाईच्या समस्येला चिंचोलीकर कारणीभूत असल्याने त्यांच्याकडून दोन्ही विभागाचा पदभार काढून घेण्याची मागणी साजीद खान यांनी केली. साजीद खान यांच्या मागणीला भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनीसुद्धा पाठींबा दर्शवला. विविध मुद्यावर गोंधळ झाल्याचे चित्र बघून महापौरांनी विषय सूचीवरील ११ पैकी पाच प्रस्तावांना मान्यता देत, सभा गुंडाळली.