विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:21 IST2020-04-25T10:19:10+5:302020-04-25T10:21:32+5:30

विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.

Confusion about university exams! | विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम!

विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम!

ठळक मुद्दे२२ मार्चपासून राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत.एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल लावणे अपेक्षित आहे. सेमिस्टर पॅटर्न विद्यापीठांसमोर अडचणीचे ठरणार आहे.

- संदीप वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २२ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, राज्यातील विद्यापीठांनापरीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. विद्यापीठांच्यापरीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.
२२ मार्चपासून राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमही पूर्ण झाला नव्हता, तसेच मौखिक व प्रात्याक्षिक परीक्षाही घेता आल्या नाहीत, तसेच विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रकही रद्द करावे लागले. २१ दिवसांचा लॉकडाउन पुन्हा वाढल्याने परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ३ मेपर्यंत व त्यानंतरही लॉकडाउन कायम राहिल्यास परीक्षा घ्यायच्या किंवा नाही, घ्यायच्या तर कशा व कोणत्या पद्धतीने घ्याव्या, यावर निर्णय घेण्यासाठी यूजीसीने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती परीक्षांविषयी आपल्या शिफारसी सरकारकडे सादर करणार आहे. या शिफारसींवरच विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या स्थितीमुळे निर्माण झालेल्या परीक्षांचा पेच सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने ६ एप्रिलपासून कामही सुरू केले आहे; मात्र यूजीसी समितीच्या शिफारसी आल्यानंतर ही समिती आपला अहवाल राज्य शासनास सादर करणार आहे. त्यानंतर राज्य शासन राज्यातील विद्यापीठांना परीक्षांविषयी आदेश देणार आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.

सेमिस्टर पॅटर्नमुळे अडचण
राज्यातील अनेक विद्यापीठांनी सेमिस्टर पॅटर्न सुरू केला आहे. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल लावणे अपेक्षित आहे. कारण जुलैपासून नवे सेमिस्टर सुरू होते. यावर्षी एप्रिलमध्ये सेमिस्टरच्या परीक्षा सुरूच झाल्या नसल्याने पुढील वर्गात प्रवेश घेण्याची प्रक्रियाही रखडणार आहे, तसेच बारावीचा निकालही लांबण्याची शक्यता असल्याने यावर्षी नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे सेमिस्टर पॅटर्न विद्यापीठांसमोर अडचणीचे ठरणार आहे.


विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसीने समिती नेमली आहे, तसेच राज्य सरकारचीही सहा सदस्यीय समिती आहे. या समित्यांच्या शिफारशींनंतर शासन ज्या प्रमाणे आदेश देईल, त्या प्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहेत.
- डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

 

Web Title: Confusion about university exams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.