क्राफ्ट डीएडच्या नूतनीकरण मुदतवाढीस विरोध
By Admin | Updated: August 15, 2014 01:23 IST2014-08-15T01:16:43+5:302014-08-15T01:23:11+5:30
हजारो विद्यार्थी राहणार प्रशिक्षणापासून वंचित

क्राफ्ट डीएडच्या नूतनीकरण मुदतवाढीस विरोध
विवेक चांदूरकर /अकोला
खासगी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या नूतनीकरणाला मुदतवाढ देण्याच्या मागणीला महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळाकडून बगल देण्यात येत असल्यामुळे हजारो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहणार असून, शेकडो प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत राज्यात शेकडो प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या. याअंतर्गत नाममात्र शुल्कावर विद्यार्थ्यांना फिडर, वेल्डर, वायरमन, हस्तकला व कार्यानुभव प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संगणक, इलेक्ट्रॉनिकचे प्रशिक्षण, असे दोन व एक वर्षाचे अभ्यासक्रम शिकविल्या जातात. ग्रामीण भागात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्यांना खासगी प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन व्यवसायाची संधी शोधावी लागते. या संस्थांना दरवर्षी ५५0 रुपयांचे शुल्क भरून नूतनीकरण करावे लागते. यावर्षी नूतनीकरणाची अंतिम मुदत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा होती. परंतु, यावर्षी अनेक खासगी संस्था ठरवून दिलेल्या तारखेच्या आत व्यवसाय प्रशिक्षणाचे नूतनीकरण करू शकल्या नाहीत. त्यानंतर या संस्थांनी नूतनीकरणाची मुदत वाढवून देण्याची मागणी मंडळाकडे केली. मात्र, मंडळाने विरोध केला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर या प्रशिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी दोन वेळा नूतनीकरणाची मुदत वाढवून देण्यात आली होती. यावर्षी मात्र मुदत वाढविण्यास मंडळाकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. या संस्थांना नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संस्थांकडून केली जात आहे. काही संघटना व राजकीय पक्षांनी याकरिता आंदोलनेही केली. तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी नूतनीकरणाला मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे प्रवेशाची वेळ निघून जाणार आहे.