अकोला: मनपातील सफाई कर्मचार्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यासोबतच अनुकंपा तत्त्वावरील १० टक्के जागा भरण्याच्या मुद्यावर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकार्यांसोबत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सकारात्मक चर्चा केली.मागील अनेक वर्षांपासून सफाई कर्मचार्यांना हक्काचे वेतन तसेच पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय लाड कमिटीच्या शिफारशी लागू नसल्याने शहराची सफाई करण्यासाठी उपलब्ध संख्या पुरेशी नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनेच्यावतीने पी.बी. भातकुले, जिल्हाध्यक्ष शांताराम निंधाने यांनी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. सेवानिवृत्त कर्मचार्यांना नियमित सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत असल्याची बाजू भातकुले यांनी मांडली. यावर १३ व्या वित्त आयोगातून कर्मचार्यांच्या वेतनाचे प्रश्न निकाली काढण्यासोबतच अनुकंपा तत्त्वावरील १० टक्के जागा भरण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त अनिल बिडवे, प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर, वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख उपस्थित होते.
अनुकंपा तत्त्वावरील १० टक्के जागा भरणार सफाई कामगारांसोबत आयुक्तांची चर्चा
By admin | Updated: May 13, 2014 21:16 IST