दिलासा : अकोल्याचा रिकव्हरी रेट ५.७ टक्क्यांनी वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:09+5:302021-04-03T04:15:09+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता, मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यात कोविड रुग्णांची ...

दिलासा : अकोल्याचा रिकव्हरी रेट ५.७ टक्क्यांनी वाढला!
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता, मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. मार्च महिन्यात कोरोनाचा कहर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही दिसून आला. नागपूर, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली. या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याचे दिसून आले, मात्र आठवडाभरात अनेक जिल्ह्यांची स्थिती बदलली. प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घसरले होते, त्यामध्ये आता सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास तुलनेने अकोल्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय कमी दिसू लागले. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ७८.४ टक्क्यांवर आला होता. हा विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट होता, मात्र गत आठवड्यापासून यात काही प्रमाणात सुधारणा दिसू लागली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट ५.७ टक्क्यांनी वाढून ८४.१ टक्क्यांवर आला आहे.
मृत्यूदर घसरला, पण चिंता कायम
गत महिनाभरापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे, मात्र आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर घसरून १.६ टक्क्यांवर आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दररोज जाणारे कोरोनाचे बळी चिंता वाढवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.