आचारसंहिता कायमच; विभागीय आयुक्तांचे मनपाला पत्र
By Admin | Updated: May 31, 2014 01:10 IST2014-05-31T01:07:09+5:302014-05-31T01:10:45+5:30
लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवरच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू; अकोल्यातील सफाईची कामे प्रभावित

आचारसंहिता कायमच; विभागीय आयुक्तांचे मनपाला पत्र
अकोला : शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून लागू झालेल्या आचारसंहितेमध्ये नेमकी कोणती कामे करता येतील, याबाबत महापालिकेत संभ्रमाची स्थिती आहे. मान्सूनपूर्व अत्यावश्यक कामाच्या परवानगीसाठी मनपाने जिल्हाधिकार्यांकडे पत्रव्यवहार केला. त्यावर शिक्षकांशी निगडित धोरणात्मक निर्णय प्रभावित न करता, इतर कामे करण्यास २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला हिरवी झेंडी दिली. एक दिवस उलटत नाही तोच, शुक्रवारी विभागीय आयुक्तांचे पत्र मनपाला प्राप्त झाले असून, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवरच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याचे स्पष्ट नमूद केल्याने प्रशासन पुन्हा बुचकळ्य़ात पडले आहे. पावसाळ्य़ाच्या पृष्ठभूमीवर शहरातील नाला सफाईसह मोर्णा नदीच्या पात्रातील जलकुंभी काढण्याची गरज निर्माण झाली. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी ती नेमकी कशासाठी लागू आहे, याबद्दल महापालिका प्रशासनात प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. नाला सफाईसह जलकुंभी काढण्याच्या मुद्यावरून मनपातील बांधकाम विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला परवानगी मागितली. यावर २९ मे रोजी शिक्षकांच्या संदर्भातील कोणतीही कामे प्रभावित होणार नाहीत,अशी कामे वगळून इतर कामे करता येऊ शकत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मनपा प्रशासनाला प्राप्त झाले. या पत्रामुळे किमान अत्यावश्यक कामे करता येतील, अशी अपेक्षा प्रशासनाला होती; परंतु झाले नेमके उलटेच. शुक्रवारी मनपाला विभागीय आयुक्तांचे पत्र प्राप्त झाले असून, त्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होती, त्याच धर्तीवर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याचे पत्रात नमूद क रण्यात आले. या पत्रामुळे प्रशासन चांगलेच बुचकळ्य़ात पडले आहे.