ढगाळ वातावरण, पावसाची प्रतीक्षाच!
By Admin | Updated: July 7, 2014 00:56 IST2014-07-07T00:33:01+5:302014-07-07T00:56:40+5:30
वर्हाडात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नाही. पेरणीला उशीर झाल्यामुळे पाऊस पडल्याबरोबरच पेरणी करण्याच्या तयारीत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ढगाळ वातावरण, पावसाची प्रतीक्षाच!
अकोला- गत दोन दिवसांपासून वर्हाडात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नाही. पेरणीला उशीर झाल्यामुळे पाऊस पडल्याबरोबरच पेरणी करण्याच्या तयारीत असलेला शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सध्या वातावरणात आद्र्रता कमी असल्यामुळे पेरणीयोग्य पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप वर्हाडात पाऊस पडला नाही. अर्धा हंगाम झाला असूनही पाऊस आला नसल्यामुळे ग्रामीण भागात चिंताग्रस्त वातावरण असून, शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यातच गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खत आधीच विकत घेऊन ठेवले असून, शेतकरी पाऊस येताच पेरणीच्या तयारीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून पाणी पडले नाही. काही शेतकर्यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र, जमिनीतील तापमान अजून कायम असून, यामध्ये पेरणी केली तर बियाणे जळण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणात आद्र्रता कमी असल्यामुळे मुबलक पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी शेतकर्यांनी पेरणी केली तर पेरणी उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे १00 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असा सल्ला कृषी संशोधकांनी दिला आहे. वर्हाडात १५ ते २0 जुलैनंतरच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.