भाजपतर्फे स्वच्छता अभियान की ‘अभिनय’?
By Admin | Updated: November 17, 2014 01:35 IST2014-11-17T01:35:26+5:302014-11-17T01:35:26+5:30
अकोला शहरात स्वच्छ रस्त्यावर राबविले अभियान.

भाजपतर्फे स्वच्छता अभियान की ‘अभिनय’?
अकोला: भाजपतर्फे रविवारी तोष्णीवाल लेआऊट परिसरातील स्वच्छ रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान सुरू होण्यापूर्वी सफाई कर्मचार्यांनी रस्त्याच्या कडेला कचरा जमा करून ठेवला होता. अभियान सुरू झाल्यानंतर जमा केलेला कचरा भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कचरा गाडीत टाकला. त्यामुळे भाजपने राबविलेले स्वच्छता अभियान होते की ह्यअभिनयह्ण, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी स्वत: रस्ते स्वच्छ करावे, अशी अपेक्षा नाही; मात्र स्वच्छतेविषयीचा संदेश देण्यासाठी असलेला हा उपक्रम अस्वच्छ परिसरामध्ये राबविला असता, तर जास्त संयुक्तिक ठरला असता, असा सूर नागरिकांमधून उमटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर भाजपतर्फे ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. रविवारी सकाळी तोष्णीवाल लेआऊट परिसरात भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दूध डेअरी ते जवाहरनगर चौक हा रस्ता सिमेंट कॉँक्रीटचा आहे. अभियान राबविण्यापूर्वी सफाई कर्मचार्यांनी कचरा रस्त्याच्या कडेला जमा करून ठेवला. त्यानंतर लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वच्छता अभियानात सहभागी झाले. त्यांनी रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा उचलून गाडीत भरला. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि सफाई कर्मचार्यांनी जवाहर चौकापर्यंतच्या मार्गावर स्वच्छता केली. रस्ता अरुंद असल्याने स्वच्छता अभियानाच्या वेळी वाहतुकीची कोंडी झाली होती.