The city of Akola has no water from the Van Project | वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच

वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच

- संजय खांडेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला शहराची तहान भागविण्यासाठी वान प्रकल्पात २४.०० दलघमी पाणी आरक्षित करण्याच्या मंजूर निर्णयास स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला शहराला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा मिळण्याची आशा धूसर झाली आहे.
अकोला महानगराला महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातून नियमित पाणी पुरवठा होता. या प्रकल्पाचा कॅचमेंट एरिया वाशिम जिल्हा परिसर आहे. अकोला शहराची तहान वाशिम जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असते. साधारणपणे दर तिसऱ्या वर्षी अकोला शहरावर भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावते हा इतिहास आहे, त्यामुळे अकोला शहराची तहान कायमस्वरूपी भागविण्यासाठी वान प्रकल्पात २४.०० दलघमी पाणी आरक्षित ठेवण्याच्या निर्णयास २९ आॅगस्ट २०१९ रोजी मंजुरी देण्यात आली. भविष्यात महान काटेपूर्णा प्रकल्प आटल्यास अकोला शहराला वानमधून पाणी मिळणार होते. त्या दिशेने योजनाही आखली जात होती; मात्र अकोला सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता शिल्पा आळशी यांनी शासनाने हा निर्णय फिरविल्याचे स्पष्ट केले आहे. आरक्षण प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर एका महिन्याने म्हणजेच १० फेब्रुवारी २० च्या अधीक्षक अभियंतांच्या पत्राने हा निर्णय फिरविला आहे.


दरवर्षी होते पाण्याची नासाडी...
अकोला, अमरावती आणि बुलडाणाच्या सीमेवर हनुमान सागर म्हणजेच वानचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तेल्हारा, अकोट परिसरात हरितक्रांती झाली आहे. एका विशिष्ट क्षमतेनंतर या प्रकल्पातील पाणी सांडव्यातून वाहून जाते किंवा सोडावेच लागते. दरवर्षी ओव्हर फ्लोमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. अन् ते पाणी थेट तापीला जाऊन मिळते. पाण्याची नासाडी होण्यापेक्षा या प्रकल्पातील २४.०० दलघमी पाणी अकोला शहरासाठी आरक्षित का असू नये असा प्रश्न उपस्थित करून अकोल्यासाठी पाणी आरक्षण ठेवण्यात आले होते.


कॅट सचिवांनी पालकमंत्र्यांना दिले निवेदन
कोला शहरासाठी २४.०० दलघमी पाणी पुरवठ्याच्या आरक्षणास शासनाने स्थगिती देण्यामागचे कारण काय, हा निर्णय का आणि कुणाच्या हितासाठी घेण्यात आला, असा थेट प्रश्न राष्ट्रीय कॅटचे सचिव अशोककुमार डालमिया यांनी अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे अशी माहिती डालमिया यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.

 

Web Title: The city of Akola has no water from the Van Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.