आरोग्य विम्यापेक्षा नागरिकांची कोरोना पॉलिसीला प्रसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 10:46 IST2020-09-29T10:46:03+5:302020-09-29T10:46:12+5:30
ठरावीक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले.

आरोग्य विम्यापेक्षा नागरिकांची कोरोना पॉलिसीला प्रसंती
अकोला : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिकांचा नियमित आरोग्य विमा घेण्यापेक्षा कोविड पॉलिसी काढण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे साधारण आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीचे प्रमाण जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती विमा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली; मात्र अशा विम्याचा लाभ प्रत्यक्ष रुग्णालयात घेण्याचे प्रमाण हे दोन टक्क्यांपेक्षाही कमी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून साधारण आरोग्य विम्याचा अर्थात मेडिक्लेमचा फायदा रुग्णांना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठरावीक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले.
कोविड पॉलिसी आॅनलाइन आणि एजंटामार्फत काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वसाधारण आरोग्य विमा योजनेपेक्षा कोविड विम्याचा हप्ता कमी असल्याने गेल्या महिनाभरात याचे प्रमाण जवळपास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आॅनलाइन विमा काढणाऱ्यांचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. विमा लागू होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमी वेळ मिळाल्याने प्रत्यक्ष रुग्णालयातील माहितीनुसार अशा कोविड विम्याचा लाभ घेण्याचे प्रमाण २ टक्के असल्याचे समजते. पुढील काही महिन्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे.
एजंटांनी सांगितले, कोविड विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. साडेनऊ महिन्यांसाठी ही पॉलिसी असून, हप्ता, वेटिंग काळ कमी असल्याने तो सहज घेता येतो. सध्या कोरोना काळात याची गरज वाढली आहे.
सध्या सर्वसाधारण आरोग्य विम्यातच कोविडचा समावेश असलेल्या योजनेकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कोरोना महामारीमुळे यात वाढ होताना दिसत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.
यामुळे वाढतोय कल
कोविड विम्याचा हप्ता हा नियमित आरोग्य विम्याच्या तुलनेत २२ ते २५ टक्के इतकाच आहे.
कोविड विमा मंजुरीसाठी प्रतीक्षा काळ १५ दिवसांचा आहे. अन्य आरोग्य विम्यात तो ३० दिवसांचा असतो.
कोविड विमा हा कॅशलेस नसला तरी त्याचा परतावा लगेच मिळतो.
हा विमा काढताना कुठल्याही तपासणीचे बंधन नाही.