बालकांचे भविष्य अधांतरी
By Admin | Updated: February 28, 2015 02:19 IST2015-02-28T02:19:15+5:302015-02-28T02:19:15+5:30
अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम, चोहोट्टा, करोडी वीटभट्टय़ांवर बालकामगार.

बालकांचे भविष्य अधांतरी
नितीन गव्हाळे / अकोला: चौदा वर्षांखालील मुलांकडून काम करून घेणे हा बालकामगार कायद्यानुसार गुन्हा आहे; परंतु हा गुन्हा जिल्हय़ातील जवळपास सर्वच वीट्टभट्टय़ांवर घडतो आहे. खेळण्या, बागडण्याच्या, शिक्षण घेण्याच्या वयात कुटुंबाचा, पोटाचा भार उचलण्यासाठी म्हणा किंवा वीटभट्टी मालकांच्या गरजेपोटी या कोवळय़ा मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र दिसून येते. शुक्रवारी लोकमत चमूने गांधीग्राम, चोहोट्टा बाजार, गोपालखेड, करोडी, दहीहांडा परिसरातील वीटभट्टय़ांवर स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशनदरम्यान या सर्वच वीटभट्टय़ांवर १४ वर्षाखालील आणि त्यावरील वयोगटातील मुले विटांचा भार वाहून नेताना दिसून आली. बालकांना कामावर ठेवणे हा गुन्हा असला तरी वीटभट्टय़ांवर हा गुन्हा दररोज घडतो आहे. चोहोट्टा बाजार परिसरातील वीटभट्ट्यांवर धारणी, मेळघाटामधील आदिवासी कुटुंब कामास आहेत. आदिवासी कुटुंबातीलही मुलांना त्यांचे आई-वडील म्हणा किंवा वीटभट्टी मालकाच्या आग्रहावरून कामावर ठेवल्या जाते. बालवयात मुलांच्या हाती पाटी, पेन्सिल द्यायला हवी. तेथे त्यांच्या हातात घमिले आणि फावडे दिल्या जाते. त्यांच्या पाठीवर दप्तराच्या ओझ्याऐवजी डोक्यावर विटांचे घमिले दिले जात असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. शहरामध्ये मोर्णा नदीच्या काठावरील वीटभट्टय़ा, जिल्हय़ातील गांधीग्राम, चोहोट्टा बाजार, करोडी, दहीहांडा, अंदुरा, बाळापूर आदी ठिकाणच्या वीटभट्टय़ांवर शेकडो बालकामगार डोक्यावर विटा उचलताना दिसून येतात. परंतु या वीट्टभट्टय़ांवरील बालकामगारांची सुटका करण्यात शासनाचा बालकामगार विभाग तर सोडाच महिला व बालकल्याण विभाग, बालकल्याण समिती, चाइल्ड लाइन, पोलीस सर्वच उदासीन आहेत. त्यामुळे बालकामगार कायदा केवळ कागदावरच उरला असल्याचे दिसून येते. या संदर्भात साहाय्यक कामगार आयुक्त एस.जी. मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालकामगारांच्या सुटकेसाठी विशेष कृती दल कार्यरत असल्याचे सांगीतले. कृती दलामार्फत आम्ही बाळापूर, चोहोट्टा येथील वीटभट्टीवर दोन बालकांची सुटका केली. कारवाईनंतर आम्ही वीटभट्टी मालकांकडून बालकांना कामावर न ठेवण्याचे हमीपत्र लिहून घेतो. तसेच तहसीलदारांना बालकांना कामावर ठेवणार्या वीटभट्टीस परवानगी देऊ नये, असे पत्र देतो. जिल्हय़ात कुठेही बालकामगार असल्याची तक्रार आल्यास आम्ही कारवाई करतो, असे त्यांनी सांगीतले.