पळून गेलेल्या मुलांचा २४ तासांत छडा
By Admin | Updated: January 29, 2017 02:13 IST2017-01-29T02:13:37+5:302017-01-29T02:13:37+5:30
घरून पळून जाणा-या मुलांचा शोध लावल्याचे तिसरे प्रकरण.

पळून गेलेल्या मुलांचा २४ तासांत छडा
अकोला, दि. २८- महात्मा फुले नगर येथून घरून पळून गेलेल्या दोन मुलांचा शोध खदान पोलिसांनी २४ तासांच्या आत लावला. खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर घरून पळून जाणार्या मुलांचा शोध लावल्याचे हे तिसरे प्रकरण आहे.
रूपा सुरेश प्रधान यांचा मुलगा यश सुरेश प्रधान (११) आणि राहुल संतोष भालेराव हे दोघे २७ जानेवारी रोजी सकाळी घरून शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती परत न आल्याने दोन्ही मुलांच्या आई-वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. दोघांच्याही शाळेत पाहणी केली असता, ते शाळेतून गेल्याचे सांगण्यात आले, तर नातेवाइकांकडे शोधल्यावरही दोन्ही मुलांचा शोध लागला नाही. त्यामुळे रूपा प्रधान यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये मुलांना पळवून नेल्याची तक्रार दिली. यावरून खदान पोलिसांनी शनिवारी दुपारी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला. कौलखेड परिसरात सुरू असलेल्या एका आनंद मेलापासून ते निमवाडी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शहरातील मंदिर, मशीद, बुद्ध विहार या ठिकाणांवर दोन्ही मुलांचा शोध घेण्यात आला; मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. बराच शोध घेतल्यावरही शोध लागत नसल्याने खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी सोशल मीडियाचा आधार घेत दोन्ही मुलांचे फोटो त्यावर अपलोड करून नागरिकांना आवाहन केले. त्यानंतर खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी आणि आणखी दोन शोध पथके तातडीने कार्यान्वित करण्यात आली. या पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या दोन्ही मुलांचा शोध शहरातीलच वाकापूर परिसरात लावण्यात खदान पोलिसांना यश आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन शेळके, बाळासाहेब नाईक व जगदीश इंगळे यांनी केली.