प्राथमिक शिक्षकांसाठी आता केंद्र शासनाची निष्ठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:41 PM2019-12-02T12:41:39+5:302019-12-02T12:42:18+5:30

या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत.

Central Government loyalty treaning for primary teachers now! | प्राथमिक शिक्षकांसाठी आता केंद्र शासनाची निष्ठा!

प्राथमिक शिक्षकांसाठी आता केंद्र शासनाची निष्ठा!

Next

- नितीन गव्हाळे  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: प्राथमिक शिक्षकांना विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन शालेय गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत निष्ठा (नॅशनल इनिटिव्हिटिव्ह फॉर स्कूल हेड अ‍ॅण्ड टीचर्स होलिस्टिक अ‍ॅडव्हान्समेंट) राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासंदर्भात शासनाने २५ नोव्हेंबर रोजी निर्देश दिले आहेत.
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षक, मुख्याध्यापक, डायटमधील अधिव्याख्याता, केंद्रप्रमुखासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने ४ डिसेंबरपासून निष्ठा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्यापन व मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, विद्यार्थी व शाळा सुरक्षितता, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर, आरोग्य या विषयांसोबतच ग्रंथालय, पर्यावरण क्लब, किचन गार्डन, युवा क्लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये, पर्यावरणविषयक जाणीव जागृती, शाळापूर्व शिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच साधन व्यक्ती व एक राज्य साधन व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात साधन व्यक्ती व राज्य साधन व्यक्ती हे तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या फ्लॅगशिपचा कार्यक्रम आहे. या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत.


राज्यासोबतच अकोला जिल्ह्यातसुद्धा निष्ठा प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी सहभागी व्हावे. निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट) करणार आहे.
-डॉ. समाधान डुकरे,
प्राचार्य जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था(डायट)

Web Title: Central Government loyalty treaning for primary teachers now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.