अकोला रेल्वेस्थानकावर लागणार ‘सीसी कॅमेरे’
By Admin | Updated: May 27, 2017 00:48 IST2017-05-27T00:48:05+5:302017-05-27T00:48:05+5:30
एक वर्षात होईल काम पूर्ण : भुसावळ डीआरएम आर.के. यादव यांची माहिती

अकोला रेल्वेस्थानकावर लागणार ‘सीसी कॅमेरे’
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छता कायम राहण्यासाठी मॉडेल ठरलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर सीसी कॅमेरे लागणार असून, या कामाला गती दिल्या जात असून, कोणत्याही परिस्थितीत वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती भुसावळचे डीआरएम आर. के. यादव यांनी दिली. दीड महिन्यापूर्वी गुप्ता यांच्या जागी बदलून आलेले यादव यांनी शुक्रवारी दुपारी प्रथमच अकोला रेल्वेस्थानकास भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. त्यामुळे जवळपास सर्वच अधिकारी त्यांच्यासाठी नवीन होते.
डीआरएम यादव शुक्रवारी अकोला भेटीवर येत असल्याची माहिती येताच अकोला रेल्वे स्टेशन मास्टर जी.बी. मीणा, आरपीएफ, जीआरपी आणि सफाई कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. डीआरएम यादवसह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा प्रामुख्याने उपस्थित होता. रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवर या पथकाने सर्व्हे केला. गाडीची स्थिती दर्शविणाऱ्या टचस्क्रीन संगणकाचा ताबा घेत त्यांनी परिस्थिती निहाळली. येथे सूचना देत तेथून ते जीआरपी पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या पे अॅन्ड पार्किंगकडे वळले. पार्किंगला शिस्त लावण्याचे निर्देश त्यांनी येथे दिले. फोर व्हीलरच्या पार्किंगचा आढावाही त्यांनी घेतला. दरम्यान, येथील वाहतूक पोलीस शिपायाशी संवाद साधून त्यांनी उपाययोजना करण्याचे सांगितले. त्यानंतर रेल्वेस्थानकाच्या तिकीटघराशेजारी असलेल्या महिला आणि पुरुषांच्या शौचालयाची पाहणी केली. सोबतच पाण्याची व्यवस्था पाहिली. त्यानंतर त्यांचा मोर्चा पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक एककडे वळला. प्रतीक्षालयाची आणि अधिकाऱ्यांच्या विश्रामालयाची पाहणीही त्यांनी केली. डीआरएम शुक्रवारी अकोल्यात येत असल्याने शुक्रवारी सकाळपासून तर ते असेपर्यंत स्थानकाच्या प्लॅटफार्मवर आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविले गेले. स्थानक परिसरात आणि रेल्वे रुळावर डीडीटी पावडरची फवारणी करण्यात आली. कधी नव्हे ते एका शिस्तीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फळी येथे प्रामुख्याने उपस्थित होती. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजतापासून तर दीड वाजेपर्यंत यादव यांनी अकोल्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बडनेरा रेल्वेस्थानकाकडे रवाना झाले.
मोटारसायकल पार्किंगला शिस्तीची गरज
रेल्वेस्थानकावरील मोटारसायकल पार्किंगला शिस्तीची गरज असल्याचे मत याप्रसंगी यादव यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांनी स्थानकाबाहेरील पे अॅन्ड पार्किंग सायकल स्टँडला भेट दिली. सोबत रेल्वेस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळील मार्ग मोकळा करण्याचे निर्देश आरपीएफ पोलिसांना दिले.