स्टेट बँकेच्या दोन व्यवस्थापकांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Updated: April 2, 2015 02:01 IST2015-04-02T02:01:35+5:302015-04-02T02:01:35+5:30
धनादेशात अफरातफर करून अडीच लाखांनी फसवणूक.

स्टेट बँकेच्या दोन व्यवस्थापकांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
अकोला - बुलडाणा जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिलेल्या ५0 हजार रुपयांच्या धनादेशात खोडतोड करून रक्कम वाढविणार्या स्टेट बँकेच्या दोन व्यवस्थापकांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खदान पोलिसांनी या तिघांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला. गौरक्षण रोडवरील समृद्धी अपार्टमेंटमधील रहिवासी सीमा अरविंद गहलोत यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५0 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशात बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड. येथील स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक देवानंद नाईक आणि बुलडाण्यातील स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक बबन शिंदे या दोघांनी सुनील चंदनसिंह बैस याला सोबत घेऊन संगनमताने ५0 हजार रुपयांच्या धनादेशात ५ या आकड्यापुढे २ आकडा लिहून हा धनादेश अडीच लाख रुपयांचा केला होता. अडीच लाखांचा धनादेश तयार केल्यानंतर ही रक्कम खात्यातून काढण्यात आली. या प्रकरणाची माहिती खातेदार सीमा गहिलोत यांना मिळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली; मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सदर दोन्ही शाखांद्वारे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गहिलोत यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर सदर तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश खदान पोलिसांना दिले. त्यानंतर खदान पोलिसांनी या प्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक देवानंद नाईक आणि बुलढाण्यातील स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक बबन शिंदे व सुनील चंदनसिंह बैस या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधनाच्या कलम ४२0, ४६३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.