कडबा पेंडीचे दर पोहोचले शेकडा पाच हजार रुपयांवर !
By Admin | Updated: February 2, 2016 01:48 IST2016-02-02T01:48:55+5:302016-02-02T01:48:55+5:30
विदर्भात चाराटंचाईचा पशुधनावर परिणाम; पशुपालक हवालदिल.

कडबा पेंडीचे दर पोहोचले शेकडा पाच हजार रुपयांवर !
राजरत्न सिरसाट/अकोला: विदर्भात आतापासूनच चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेले कडबा पेंडीचे दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंंत पोहोचल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पशुधनाला लागणार्या हिरव्या चार्याची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चाराही विकत घेण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले असून, सोबतच चार्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी ज्वारी, कापूूस हे या भागाचे मुख्य पीक होते. अलिकडच्या काही वर्षांंमध्ये या पिकांची जागा सोयाबीनने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक आणि आवश्यक कडबा कमी झाला आहे. परिणामी कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५0 रुपयापर्यंंत पोहोचला आहे. या कडब्यापासून तयार होणार्या कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंंत गेला आहे. भरीस भर, वजनात जास्त भरावी, यासाठी ही कुट्टी ओली करू न पशूपालकांना विकली जात आहे. यावर्षी कोरडवाहू क्षेत्रात तुरीचेही उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या कुटाराचे दर तीन ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंंत पोहोचले असून, सोयाबीनचे खाद्य (कुटार) जनावरे खात नसली, तरी या कुटाराचा दर तीन रुपये किलो झाला आहे. हरभर्याचे कुटार पाच ते सात रुपये किलो असून, सुबाभूळ, पिंपळ, कडुनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने विकला जात आहे. चार्याचे दर प्रचंड वाढल्याने शेतकर्यांना पशुधन ओझ्यासारखे वाटत असून, परिणामी वाटेल त्या दरात पशुधन विकण्यात येत आहेत. गव्हाचे कुटार (गव्हंडा) जनावरे खात नाहीत. तथापि, या गव्हंड्याचाही दर २५0 ते ३00 रुपये क्विंटलपर्यंंत पोहोचला आहे.