तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडी, रोखसह चांदीची नाणी लंपास
By नितिन गव्हाळे | Updated: July 20, 2023 17:34 IST2023-07-20T17:34:04+5:302023-07-20T17:34:12+5:30
वाशिम बायपासवरील तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडीची घटना समोर आली आहे.

तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडी, रोखसह चांदीची नाणी लंपास
अकोला: वाशिम बायपासवरील तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडीची घटना समोर आली आहे. घरमालक दोन महिन्यांपासून पुण्यात मुलाकडे असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून ३० हजार रुपयांची रोख व ८० ग्रॅम चांदीची नाणी चोरून नेली. ही घटना १७ जुलै रोजी घडली. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राजपूत पुऱ्यात राहणारे विशाल रमेश वाघमारे (४०) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे सासरे निरंजन खंडारे (रा. तथागत नगर) हे दोन महिन्यांपासून मुलाकडे पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे घर बंद आहे. १७ जुलै रोजी सकाळी त्यांचा भावसासरा नीलेश खंडारे यांचा फोन आला. त्यांनी घरात चोरी झाल्याचे सांगितले.
त्यामुळे घराकडे गेल्यावर दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरात पाहिल्यावर कपाटातील ३० हजार रुपये व ८० ग्रॅम चांदीची नाणी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.