बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:14 IST2020-02-26T15:10:45+5:302020-02-26T15:14:50+5:30
२० प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या १४ महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील २० प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दरम्यान, यामध्ये महसूल विभागात सर्वाधिक पाच सापळे रचून वर्ग दोनचे दोन अधिकारी व एक वर्ग तीनच्या अधिकाºयावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये त्याच्या खालोखाल एसीबीने सापळे रचत चार जणांविरोधात कारवाई केली.
पोलिस विभागात तीन जणांवर, भूमि अभिलेख विभागात एक, आणि महसूल विभागातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एक तर महावितरणमध्ये दोन कर्मचाºयांवर तर नगररचना विभागात दोन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे २०२० मध्येही आतापर्यंत तीन शासकीय कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वन्यजीव विभागातंर्गत लोणार येथील वर्गदोनचा एक अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागला होता तर महसूल विभागातील दोन कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली आहे.
अमरावती विभाग राज्यात दुसरा
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी राज्यभरातच लाच प्रकरणांमध्ये धडक कारवाई केली असून त्यामध्ये अमरावती विभाग हा कारवाई करण्यामध्ये राज्यात दुसरा ठरला आहे. राज्यात गेल्या वर्षी १३२ जणांवर राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामध्ये पुणे विभागाने ३० जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली होती तर अमरावती विभागाने २७ जणा विरोधात कारवाई केली होती.