तरुणीवर भरदिवसा ‘ब्लेड’ हल्ला
By Admin | Updated: July 15, 2014 00:15 IST2014-07-15T00:15:28+5:302014-07-15T00:15:28+5:30
एका तरुणीवर भरदिवसा अज्ञात इसमांनी घरात घुसून ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना

तरुणीवर भरदिवसा ‘ब्लेड’ हल्ला
चोहोट्टा बाजार : अज्ञात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याच्या अफवेने परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली असताना येथून जवळच असलेल्या ग्राम करोडी येथे एका तरुणीवर भरदिवसा अज्ञात इसमांनी घरात घुसून ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवार, १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. करोडी येथील रघुनाथ जाधव हे दुपारच्या सुमारास विश्रांती घेत असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांची मुलगी प्रियंका जाधव (२0) ही कामात मग्न होती. या अज्ञात इसमांनी अचानक तिच्यावर ब्लेडने वार केले. या हल्ल्याने ती गांगरून गेली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या ओढणीनेच तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात प्रियंकाची आई घरी परतली. आईला पाहताच आरोपींनी घरातून पळ काढला व प्रियंकाचे प्राण वाचले. ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी जाधव यांच्या घराजवळ गर्दी केली. त्यानंतर काहींनी जखमी अवस्थेतील प्रियंकाला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले व याबाबतची वर्दी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताचा दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ताराचंद किल्लेवाले व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून प्रियंकाला पुढील उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात हलविले. या घटनेमुळे करोडी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दहीहांडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.