अन्यायाची परंपरा खंडित करा;
By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-21T00:24:32+5:302014-07-21T00:24:32+5:30
वेगळ्या विदर्भ चळवळीला साथ द्या- शरद पाटील

अन्यायाची परंपरा खंडित करा;
अकोला: आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राजकारण्यांसाठी ही महत्त्वाची वेळ आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज सत्ताधीशांपर्यंंत पोहोचवा, अन्यायाची परंपरा खंडित करून, वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला साथ द्या, असे आवाहन जनमंच या सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रा. शरद पाटील यांनी रविवारी सकाळी १0.३0 वाजता आयएमए हॉलमध्ये आयोजित बैठकीत विदर्भवाद्यांना केले. जनमंच संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी आयोजित ह्यरेल देखो बस देखोह्ण आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शरद पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे होते. यावेळी मंचावर अँड. अनिल किलोरे, कृष्णा अंधारे, गणेश पोटे यांची उपस्थिती होती. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका मांडताना शरद पाटील म्हणाले की, नेतृत्व करणारा कोणत्या समाजाचा आहे, हे बघायला नको, या समाजवादानेच देश बुडवला आहे. नेतृत्व करणारी व्यक्ती प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे.
आगामी तीन महिने महत्त्वाचे आहेत. यानंतर नेते पाच वर्षे हाती लागणार नाहीत. त्यामुळे जनतेने पुढील तीन महिन्यात क्रियाशील राहून वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सहभागी व्हायला हवे. हिंदी भाषिक लोकांची पाच राज्य आहेत तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी चंद्रकांत वानखडे म्हणाले की, तीन महिन्यांनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुकीच्या काळात अनेक चमत्कार घडतात. गेंड्याची कातडी असलेले नेते मुलायम होतात. त्यामुळे आंदोलनाची हीच योग्य वेळ आहे. भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल होते. आता मात्र त्यांची भाषा बदलली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच वेगळा विदर्भ व्हायला हवा, अशी आमची मागणी आहे. वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी आहे, आम्ही घेतलेल्या मतदानातून ते व्यक्त झालं आहे.
त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन वानखडे यांनी केले. यावेळी अँड. अनिल किलोरे व गणेश पोटे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक कृष्णा अंधारे यांनी तर संचालन धनंजय मिश्रा यांनी केले.