आचारसंहितेचा भंग; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:52+5:302021-01-08T04:56:52+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील शिरपूर येथे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करीत शिरपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार रुम ...

आचारसंहितेचा भंग; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
खेट्री : पातूर तालुक्यातील शिरपूर येथे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करीत शिरपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार रुम खान सुजात खान यांनी जिल्हाधिकारी व पातूर तालुका निवडणूक अधिकाऱ्यांना ४ जानेवारी रोजी तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी करून नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रुम खान सुजात खान यांनी तक्रारीतून केली आहे.
रुम खान सुजात खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिरपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन जणांच्या पथकामार्फत मतदारांना घरकुल देण्याचे आमिष दाखवून आचारसंहितेचा भंग केला. शिरपूर येथे तीन जणांचे तोतया पथक बोलावून उमेदवारांच्या घरी मतदारांना गोळा करून घरकुलाचा लाभ मिळवून देतो, म्हणून नावनोंदणी करा, असे आमिष दाखविल्याचा आरोप तक्रारीत रुम खान यांनी केला आहे. तसेच रुम खान यांनी या प्रकाराचा व्हिडीओ काढला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पथकाला रुम खान यांनी विचारपूस केली असता पथकातील सदस्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत रुम खान व ग्रामस्थांनी पातूरच्या निवडणूक अधिकारी व तहसीलदारांशी संपर्क केला असता, त्यांनी आचारसंहिता सुरू असताना कोणतेही पथक पाठवता येत नाही, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची चौकशी करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून रुम खान यांनी केली आहे.
-----------------------------
शिरपूर येथील उमेदवार रुम खान सुजात खान यांची तक्रार प्राप्त झाली असून, त्याबाबत चौकशी करण्यात येईल, चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल.
- अनंता लव्हाळे, गटविकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी, पातूर
--------------------------
प्रतिक्रया
डीआरडी विभागांतर्गत घरकुलाचा सर्व्हे सुरू आहे. त्यानुसार आम्ही शिरपूर येथे सर्व्हे करण्यासाठी गेलो होतो. राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही.
- शारदा विकास देशमुख, वर्धिनी सेविका, डीआरडी विभाग, अकोला
--------------------------